पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६

 दुसरी आंग्ल स्त्री धि ऑनरेबल एमिली ईडन हिनें ता. ७ डिसेंबर इ. स. १८३७ रोजीं अलहाबाद मुक्कामीं हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल लॉर्ड ऑक्लंड ह्यांचेबरोबर बायजाबाईसाहेबांची भेट घेतली. त्या वेळीं तिनें "बायजाबाई ह्या वृद्ध असून दिसण्यांत हुशार आहेत, व त्यांचे चेहऱ्यावर सौंदर्याचा अंश अद्यापि कायम आहे" असें वर्णन केलें आहे. ह्यानंतर इ. स. १८५८ सालीं मिसेस ड्युबर्ली नामक दुसऱ्या एका आंग्ल युवतीनें बायजाबाईंची भेट घेतली होती. त्या प्रसंगी तिनें त्यांच्याबद्दल असा उल्लेख केला आहेः– "बायजाबाईसाहेब ह्या पडद्याजवळ उच्च स्थानीं बसल्या होत्या. त्यांच्या साधेपणामुळें व त्यांच्या प्रौढ व गंभीरवर्तनामुळें माझे लक्ष्य चटकन् त्यांच्याकडे गेलें. त्यांचे नेत्र अद्यापि विलक्षण तेजस्वी दिसतात; त्यांकडे पाहून, प्रकाशामध्यें द्राक्षार्क धरिला असतां त्याची जी चमक दृष्टीस पडते, तिंचे मला स्मरण झालें. त्यांचे वय ७० वर्षांपेक्षां अधिक आहे; परंतु त्यांच्या जास्वल्य आणि राजकारणप्रचुर तारुण्यावस्थेंत त्यांच्या ठिकाणीं जो उत्साह होता, तो अद्यापि कायम आहे." ज्या अर्थीं आंग्ल स्त्रियांनीं बायजाबाईसाहेबांच्या उतारवयामध्यें देखील त्यांच्या स्वरूपाबद्दल इतके चांगले उद्गार काढिले आहेत, त्या अर्थीं तारुण्यावस्थेंत ते अप्रतिम असले पाहिजे हें उघड आहे.


 1. "She is a clever looking little old woman, with remains of beauty." -Up the country. Vol. 11 Page 65.

 2."The Bhae-sa-bhae sat in the place of honour next the purdah, and arrested my attention at once, both by the simplicity of her toilette and the great dignity and self-possession of her deportment. The lustre of her still glorious eyes reminded me of the light which shines through port-wine when held against the light. She is over seventy years of age, but apparently as energetic as in the days of her fiery and intriguing youth,' -Mrs. Duberly.