बातमी कर्नल जेकब ह्यांनीं बायजाबाईंस कळविली; व महाराजांच्या हेतूप्रमाणे सैन्यानें कांहीं गडबड करूं नये ह्मणून सक्त ताकीद दिली. अर्थात् महाराजांचा हा बेत विसकटल्यामुळें ते निराश झाले; व त्या दिवशींची सर्व रात्र राजवाड्याबाहेर घालवून ते सकाळीं रेसिडेन्सीमध्यें गेले. परंतु रेसिडेंटसाहेबांची व त्यांची भेट झाली नाहीं. तेव्हां ते एका लिंबाच्या झाडाखालीं एकसारखें धरणें घेऊन बसले. पुढें रेसिडेंटसाहेब तेथें आले व त्यांनी त्यांस आपल्या बंगल्यामध्यें नेलें. तेथें त्यांचें बराच वेळ संभाषण झालें. परंतु रेसिडेंटांकडून त्यांना कांहीं मदत मिळाली नाहीं. तेव्हां शेवटीं ते निराश होऊन परत राजवाड्यांत गेले. राजवाड्यामध्यें त्यांच्या गुप्त मसलतीची बातमी कळली होती; ह्मणून तिच्यावर पांघरूण घालण्याच्या उद्देशानें त्यांनी बायजाबाईसाहेबांची भेट घेतली, व त्यांची माफी मागून झालेली चुकी पोटांत घालावी अशी त्यांची विनवणी केली; व पुनः असें करणार नाहीं ह्मणून त्यांच्याजवळ शपथ घेतली. परंतु त्यांचे हें सर्व वर्तन मायावी होते, असें लवकरच दिसून आलें.
महाराज जनकोजीराव बायजाबाईसाहेबांच्या जवळ शपथक्रिया करून आपल्या महालांत गेले, त्याच रात्रीं, हुकूमसिंग नामक एक पलटणीवरचा नाईक अगोदर ठरलेल्या गुप्त संकेताप्रमाणें राजवाड्यांत चोरून गेला; व त्यानें जनकोजीरावांच्या महालामध्यें शिडीवरून चढून जाऊन त्यांस अचानक उचलून खाली आणिलें. इकडे वरुण व बहादुर ह्या दोन पलटणी फितल्या असून, त्यांनी महाराजांस हस्तगत करून त्यांच्या नांवानें द्वाही फिरविण्याचा व बायजाबाईंस कैद करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणें त्यांनी महाराजांस हस्तगत करून फुलबागेमध्यें नेले; आणि त्या बायजाबाईंस कैद करण्याच्या प्रयत्नास लागल्या. बायजाबाईसाहेबांचे बंधु हिंदुराव