पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/122

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८

ज्या वेळीं ग्वाल्हेरचे रेसिडेंट होते, त्या वेळीं त्यांनीं महाराज दौलतराव शिंदे ह्यांस दत्तक घेण्याबद्दल वारंवार सूचना केली; परंतु त्यांनी ती मान्य केली नाहीं. पुढे त्यांनी मृत्यूपूर्वीं कांही महिने अगोदर, चांगलें अक्कलहुषारींत असतांना, आपल्यापश्चात् बायजाबाईनीं सर्व राज्यकारभार सांभाळावा, अशी इच्छा भरदरबारामध्ये प्रदर्शित केली. त्याप्रमाणें महाराज दौलतराव मृत्यु पावल्यानंतर सर्व राज्यसूत्रें बायजाबाईंनीं धारण केली आहेत. गादीच्या वारसाबद्दल प्रश्न उपस्थित होऊन घोंटाळा होऊं नये, ह्मणून त्यांनीं तुह्मांस दत्तक घेतलें आहे. परंतु अमक्याच वर्षीं दत्तकावर सर्व राज्यभार सोंपवूं ह्मणून त्यांनी ब्रिटिश सरकाराशीं करार केलेला नाहीं. सारांश, तुह्मी जे ह्या महापदावर चढला, त्याचें सर्व श्रेय बायजाबाईंकडे आहे; व त्याचा संबंध ब्रिटिश सरकाराशीं मुळीच नाहीं. तुह्मांस राज्याधिकारी होण्याचा प्रसंग सुदैवाने लवकरच येईल; तोपर्यंत तुह्मीं वाट पाहिली, तर बायजाबाईंनीं तुमच्याखेरीज दुसऱ्या कोणास गादीचा वारस करूं नये एवढें मात्र आह्मी त्यांस सांगू. ह्यावर तुह्मीं विश्वास ठेवावा. परंतु असें न करितां, जर तुह्मी दंगेधोपे करून बायजाबाईंस राज्यावरून काढण्याचा प्रयत्न कराल, तर मग त्याचा जो बरावाईट परिणाम होईल, तो तुमचा तुह्मांस भोगावा लागेल. अशा गडबडींत जर तुमचा खून झाला, अथवा तुह्मी कैद झाला, तर ब्रिटिश सरकार तुमचा कैवार घेऊन बिलकूल मध्यस्थी करणार नाहीं, किंवा तुमच्या गादीच्या वारसापणाबद्दल हमी घेणार नाहीं." ह्याप्रमाणें गव्हरनरजनरलसाहेबांनीं महाराजांस स्पष्ट रीतीनें आपलें मत कळविलें व आणखीही योग्य उपदेश केला, व महाराजांनी त्याप्रमाणे वर्तन करण्याचें मान्य केलें.

 ह्या भेटीच्या वृत्तांतावरून बायजाबाईंनीं सर्व राज्यकारभार चाल-