Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७



ह्या कृपाळुपणाबद्दल त्यांचे आभार मानून आपली सर्व हकीकत सांगण्यास सुरवात केली. त्या हकीकतीचा मथितार्थ इतकाच होता कीं, आपण आतां प्रौढ झालों असून, शास्त्राप्रमाणें व शिंद्यांच्या घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीप्रमाणें राज्याचा अधिकार आपणांस मिळावा. नामदारसाहेबांनीं महाराजांची सर्व हकीकत ऐकून घेऊन, त्यांचें मागणें किती चुकीचें आहे हें त्यांस समजावून सांगितलें. ते ह्मणालेः– "राज्याचा अधिकार कोणाकडून घेण्यास अथवा कोणास देण्यास मला मुळींच अखत्यार नाही. कारण, शिंदे सरकारचें राज्य अगदीं स्वतंत्र आहे. ब्रिटिश सरकारानें कोणास मसनदीवर बसविलें नाहीं व कोणास तिच्यावरून ते काढणारही नाहींत. प्रस्तुत प्रसंगी त्यांना आपल्या राज्यकारभाराचे धोरण बदलण्याचे प्रयोजन नाहीं." हे नामदारसाहेबांचे शब्द ऐकून महाराजांनी असा प्रश्न विचारिला कीं, "मग मला दत्तक घेण्याचा हेतु काय ?" नामदारसाहेबांनीं त्यांस उत्तर दिलें कीं, "तुह्मांस दत्तक घेण्याचा उद्देश, शिंद्यांच्या घराण्याचे नांव चालावें व वारसाबद्दल वादविवाद उत्पन्न होऊन पुढें विपरीत परिणाम होऊं नये, हा आहे. ब्रिटिश सरकारानें बायजाबाईंकडून तुह्मांस अमकेच वर्षीं गादीवर बसवावें, असा करार करून घेतलेला नाहीं. बायजाबाईंच्या कृपेनें तुमचें दत्तविधान होऊन तुह्मांस शिंद्यांच्या गादीच्या वारसाचा हक्क मिळाला, हें तुह्मीं आपलें मोठें भाग्य समजलें पाहिजे. ह्या उपकाराची फेड तुह्मीं अशा रीतीनें करू नये." महाराजांनीं गव्हरनरजनरलसाहेबांच्या भाषणाचा प्रतिकूल कल पाहून पुनः असा प्रश्न विचारला कीं, "आतां नाहीं, तर मग पुढे किती वर्षांनी मला राज्याधिकार मिळेल ?" त्यावर नामदारसाहेबांनीं "ह्या प्रश्नास आह्मी जबाब देऊ शकत नाहीं." असें चोख उत्तर दिले. आणखी, त्यांना सामोपचारानें असे सांगितलें कीं, "महाराज, तुह्मी या गोष्टीचा नीट विचार करा. मेजर स्टुअर्ट हे