Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५



बायजाबाईसाहेब ह्यांचे बंधु हिंदुराव घाटगे व जांवई आपासाहेब पाटणकर आणि दरबारचे इतर प्रमुख मानकरी व सरदार लोक महाराजांबरोबर मोठ्या थाटानें गजारूढ होऊन गेले होते. त्यांच्या वैभवानें शृंगाराभिरुचि दिपून जाऊन, ती बिचारी तेथून लोपली होती कीं काय, असें वाटत असे. महाराजांची व नामदारसाहेबांची मुलाखत होऊन कांहीं वेळ एकांत भेट झाली. हिंदुराव व आपासाहेब ह्यांचे व महाराजांचे अंतःकरणांतून रहस्य नसल्यामुळें, त्यांना नामदार साहेबांनी महाराजांस खाजगी भेट दिल्याचे पाहून फार आश्चर्य वाटलें. त्यांचा व महाराजांचा एकांत तीन तासपर्यंत चालला होता. तो पाहून, महाराजांना कांहीं लहर येऊन त्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांस, आपणांस गादीवर बसविल्यावांचून सोडीतं नाहीं, ह्मणून हट्ट धरून अडवून ठेविलें आहे की काय, अशी शंका घेण्यास कारण झाले. तसा कांहीं प्रकार झाला असता, तर महाराजांस तेव्हांच निरोप मिळून रणकंदनाचाच प्रसंग ठेपल्यावांचून राहाता ना. महाराणींचे सैन्य तयार होतेंच व आमचेंही सैन्य तयार होतेंच. त्या उभयतांपैकीं कोणाची तरी महाराजांच्या लोकांशी चकमक उडाली असती. परंतु जनकोजीराव ह्यांस, महाराणीच्या सैन्याची व आपली लढाई झाली, व तींत आपण कैद झालों, तर आपणांस गव्हरनर जनरलसाहेबांकडून कांहीं मदत होणार नाहीं, असें कळून चुकलें होतें. त्यामुळें त्यांनीं अतिप्रसंग न करितां, तीन तासपर्यंत गव्हरनर जनरलसाहेबांजवळ, आपणांस राज्याधिकार मिळावा ह्मणून एकसारखी कर्मकथा चालविली होती. असो. ही भेट संपल्यानंतर दुपारीं लेडी उइल्यम ह्या आमच्या लष्करातील सर्व आंग्ल स्त्रिया बरोबर घेऊन महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस भेट देण्याकरितां गेल्या. त्यांचा महाराणीसाहेबांच्या वतीने चिमणाबाईनें उत्तम प्रकारें आदरसत्कार केला. चिमणाबाईचें आदरकौशल्य आणि रीतभात