पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४

दिली. त्या वेळीं त्यांच्याबरोबर त्यांची कन्या चिमणाबाई (ही आपासाहेब पाटणकर ह्यांस दिली होती ) व इतर सरदारांच्या स्त्रिया गेल्या होत्या. युरोपियन स्त्रियांना ह्या भेटीचें फार कौतुक वाटून त्या, लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांस, राजस्त्रियांच्या स्वागताचे कामीं मदत करण्याकरितां आल्या होत्या. युरोपियन स्त्रियांनीं चिमणाबाईचें सौंदर्य पाहून त्यापुढें आपलें रूप कांहींच नव्हे, असे प्रांजलपणें कबूल केलें. त्यांनीं, तिचें अप्रतिम लावण्य, तिचा गौरवर्ण, तिचे तेजस्वी व पाणीदार नेत्र आणि नाजूक व रेखलेले अवयव पाहून, इंग्लंडांतील प्रत्येक स्त्री तिचा हेवा करील, अशा प्रकारें तिच्या रूपाची फार फार प्रशंसा केली. ह्या वेळीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांनीं महाराणीसाहेबांस कांहीं चिनी वस्तू व अलंकार नजर केले. हे त्यांच्या भेटीच्या अगोदर तीन चार तासपर्यंत सर्वांच्या प्रदर्शनार्थ मांडून ठेविले होते. ते फार सुंदर होते असें ह्मणतात. राणीसाहेब मेण्यांत बसून आल्या, त्या वेळीं त्यांच्याबरोबर साहा परिचारिका पायीं चालत होत्या. मेण्यावर लाल रंगाच्या मखमलीची भरजरी बुटेदार चादर पसरलेली होती. ती फार मूल्यवान् असून तिच्यासभोंवतीं मोत्यांचे गोंडे लोंबत होते. राणीसाहेबांच्या दासी व इतर स्त्रिया ह्यांनीं अतिशय उंची वस्त्रे व बहुमूल्य अलंकार परिधान केल्यामुळें त्यांच्याकडे पाहून दृष्टि दिपून जात असे.

 दुसरे दिवशीं सकाळीं, महाराज जनकोजीराव शिंदे लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस भेटण्याकरितां गेले होते. त्यांचा लवाजमा व थाट अगदीं अपूर्व होता. ते स्वतः एका शृंगारलेल्या हत्तीवर बसले होते. हत्तीच्या अंगावर भरजरीची झूल व गळ्यामध्यें सुवर्णाच्या माळा आणि गंडस्थळावर निरनिराळे अलंकार घातले होते. त्यामुळे तो प्रचंड प्राणी फार सुशोभित दिसत असून, आपल्या ऐश्वर्याचें प्रदर्शन करण्याकरितांच जणू मंद गतीनें चालत आहे, असें वाटत होते. महाराणी