पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/112

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८

आपण होऊन केलेल्या मदतीचा स्वीकार न करून तिच्याकडे दुर्लक्ष्य केलें; व आपला उर्मटपणा व बेपरवाई स्पष्ट रीतीनें व्यक्त केली."

 मेजर स्टुअर्ट ह्यांच्यासारख्या ग्वाल्हेर संस्थानाच्या खऱ्या हितचिंतक व निःपक्षपाती रेसिडेंटानें अल्पवयी महाराजांविषयीं आपला जो अभिप्राय व्यक्त केला आहे, त्यावरून महाराजांचें खरें वर्तन कशा प्रकारचें होतें, ह्याविषयीं नीट कल्पना करितां येते. अर्थात् अशा अज्ञान व विचारशून्य बालराजाच्या हातीं संस्थानच्या राज्यकारभाराचीं सूत्रें देणें ही गोष्ट, बायजाबाईसाहेबांसारख्या शहाण्या व राजकारणी बायकोस अप्रशस्त व अनर्थावह वाटावी, हें अगदीं साहजिक आहे. त्यामुळें अशा बालराजास त्यांनी स्वातंत्र्य दिलें नाही, किंवा राज्याधिकार दिला नाहीं, ह्याबद्दल त्यांना दोष देणें रास्त नाहीं. परंतु खरा इतिहास व खरी वस्तुस्थिति माहीत नसल्यामुळें कांहीं इतिहासकारांचा हा गैरसमज झालेला आहे. असो.

 मेजर स्टुअर्ट ह्यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठ सरकारास कळविला. परंतु, बायजाबाईसाहेब ह्या राज्यकारभार चालविण्यास खंबीर असल्यामुळें व त्या वेळीं एतद्देशीय संस्थानांतील अंतर्व्यवस्थेंत हात घालण्याचा वरिष्ठ सरकारचा हेतु (Policy) नसल्यामुळें, हा कलहाग्नि कांहीं कालपर्यंत तसाच धुमसत राहिला. संस्थानांतील कलहप्रिय व स्वार्थसाधु सरदारांचे व लष्करी अधिकाऱ्यांचें त्यास जोंपर्यंत साहाय्यरूपी तेल मिळालें नाहीं, व वरिष्ठ सरकारच्या अनुकूलतेचा वारा त्यास लागला नाहीं, तोंपर्यंत त्याच्या ज्वालांनीं पेट घेतली नाही. परंतु पुढें दोन्ही गोष्टी प्राप्त होतांच, त्याच्या ज्वाला प्रदीप्त होणार व त्यांत कोणाची तरी


 1. Major Stewart's despatches quoted in Sutherland's Sketches. Page 191.