Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वीररसपरिप्लुत व रमणीय आहेत कीं, त्यांच्या योगाने अंतःकरण तल्लीन झाल्यावांचून राहत नाहीं.

 ह्या रजपूत स्त्रियांनंतर मराठ्यांच्या स्त्रियांकडे वळलें, तर त्यांचींही चरित्रें तशींच मनोहर व रसभरित आहेत असे गर्वानें ह्मणतां येतें. ह्या सर्व महाराष्ट्र स्त्रियांमध्यें इंदूरच्या महाराणी अहल्याबाई ह्यांचे चरित्र अत्यंत पवित्र, अत्यंत रसाळ, आणि अत्यंत सोज्वल आहे. त्या चरित्राची बरोबरी सर्व राष्ट्रांतील व सर्व देशांतील एकाही स्त्रीचरित्रानें करवणार नाहीं. टॉरेन्स नामक इंग्रज ग्रंथकारानें अहल्याबाईची तुलना, रशियाची राणी क्याथराईन, इंग्लंडची राणी इलिझाबेथ, आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट ह्यांच्याशी करून, देवी अहल्याबाई त्यांच्याहीपेक्षां अनेक सद्भुणांनीं श्रेष्ठ होती, असे प्रांजलपणे कबूल केले आहे. दुस-या एका इंग्रज ग्रंथकारानें ही साध्वी रूपाने सुंदर नव्हती, तरी वर्डस्वर्थ, कवीनें वर्णिल्याप्रमाणेः

“A perfect woman, nobly plann'd
To warn, to comfort, and command;
And yet a spirit still and bright
With something of an angel-light."

“सर्व जनांस सन्मार्ग दाखविण्याकरितां, त्यांना सुख देण्याकरितां, आणि त्यांच्यावर अधिकार चालविण्याकरितां निर्माण झालेली ही सर्वगुणसंपन्न अशी स्त्री परमेश्वराची एक अपूर्व कृति होती. तिची कांति तेजस्वी असून सुशांत अशी होती; किंबहुना ती एक तेजोमयी देवताच होती.” असें ध्वनित करून, निरभिमानतया असें कबूल केले आहे कीं, ही लोकोत्तर स्त्री आपली अपूर्व धर्मशीलता, उदात्त सुशीलता, निस्सीम कर्तव्यदक्षता, विलक्षण कार्यक्षमता, अद्भुत तेजस्विता आणि प्रशंसनीय उद्यमशीलता - इत्यादि सद्गुणांच्या योगानें हिंदुस्थानांतील पुण्यश्लोक व महाप्रतापी अशा कोणत्याही नृपवर्याच्या मालिकेंत, अथवा कोणत्याही राष्ट्रांतील स्त्रीजातीच्या अत्यंत तेजस्वी अशा रत्नावलींत, विराजमान होण्यासारखी आहे[]


  1. 1 "This wonderful woman, for her piety, her elevation of character, her profound sense of duty, her great ability, and