पान:बाणभट्ट.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८४ ) संसार सुखाचा त्याने अद्यापि कांहीएक अनुभव घेतला नाही. तसेच अद्यापि कांहीं पुण्यकर्म केले नाहीं व कीर्तिहि मिळविली नाहीं. असे असून त्यानें असे कसे केलें ? हें कांहींच समजत नाहीं. " याप्रमाणे चिंतन करीत तो बराच वेळ त्या ठिकाणी बसला. मग राजेलोकांस स्वस्थानी जावयास सांगून आपणास राहण्याकरितां तयार केलेल्या ठिकाणीं तो गेला. तेथे गेल्यावर आपणाकरितां अनेक सुखोपभोगाचे पदार्थ तयार केले होते तिकडे कांहींच लक्ष न देतां तो चिंताक्रांतच राहिला. तो आपल्या मनांत ह्मणाला, "वडिलां- सन विचारितां या ठिकाणांहूनच वैशंपायनाकडे मी गेलों तर मींहि त्याचेंच अनुकरण केलेंसें होईल. वडिलांस विचारून त्याला आणण्याकरितां जाण्याचें केले तर माझें कोणी निवारण करणारा आहे असें नाहीं. कादंबरी ची भेट कशी होते ? म्हणून एकसारखी काळजी वाहणाऱ्या मजवर त्यानें हा मोठा उपकारच केला ह्मणावयाचा. आतां जेथें वैशंपायन तेथेंच कादंबरी ! तेव्हां तिजकडे जाण्याला है एक निमित्त बरें उपस्थित झालें !" पुढें दुपारची कडक उष्णता भासूं लागली म्हणून ती वेळ घालविण्या- करितां सरोवराच्या कांठीं जागा तयार केली होती तिकडे तो गेला. ऊन्ह उतरल्यावर तो तेथून निघून पहिल्या ठिकाणी आला. तेथें जमलेल्या राजे. लोकांबरोबर वैशंपायनाच्या गोष्टी बोलत तो बसला. रात्र झाली तेव्हां सर्व लोकांस ' आतां तुह्मीं निघून उज्जयनीस जावें, ' असे सांगून तो निद्रा करण्याकरितां गेला, परंतु त्यास झोप आली नाहीं. मग तो दोन प्रहर रात्र उलटल्यावर तेथून निघून उजाडण्याच्या सुमारास उज्जयनीस येऊन पोहोंचला. तेथे पाहतो तो पुष्कळ नगरवासी लोक उज्जयनींतून बाहेर पडून शोक करीत उभे आहेत, व वैशंपायनाचें वर्तमान विचारीत आहेत, असे त्याच्या दृष्टीस पडलें. तेव्हां त्याच्या मनांत आलें, इतर लोकांची जर अशी स्थिति, तर ज्यांनी वैशंपायनाला मांडीवर खेळविलें, त्यांची काय अवस्था असेल ? तर आतां वडील माणसास मी आपले तोंड तरी कसे दाखवावें ? अशी चिंता करीत, व कोणाकडे न पाहतां व न बोलतां तो राजवाड्याजवळ येऊन उतरला. तेथें त्यास आपले मातापितर प्रधानाच्या घरी गेले आहेत, असे समजले. तेव्हां तोहि तिकडेच गेला. प्रधानाचे वाड्याजवळ जातांच मनोरमेचा शोक त्याचे कानी पडला व आपली आई तिचे समाधान करीत