पान:बाणभट्ट.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५० ) " देवालयाचे कळस सोन्याचे आहेत. त्यांवर शुभ्र ध्वज उभारलेले असून ते वायूच्या योगानें हालत असल्यामुळे, ज्यांच्यावर गंगेचे प्रवाह चालले आहेत, अशीं ह्रीं हिमालयाची शिखरेंच आहेत काय असे भासते ! ठिक- ठिकाणी शुभ्र मंदिरें असून ती केळी, नारळी यांनी शोभायमान दिसतात. त्या उज्जयिनीनगरीस लागून शिप्रानदी वाहते. तिच्या प्रवाहाच्या लाटा उंच उंच उसळत असल्यामुळे महाकालाच्या मस्तकावर बसलेल्या गंगेस पाहून इर्षेनें तरंगरूप भुवया वाकड्या करून आकाशापर्यंत ती उचंबळतेच आहे काय असे दिसतें ! भगवान् महाकाल कैलासपर्वत सोडून तेथें वास करतो आहे, तेव्हां तेथील महिमा किती सांगावा ! त्या नगरीत भगीरथादि राजांसारखा महापराक्रमी तारापीड नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याची संपत्ति पाहून विष्णूचें वक्षःस्थल सोडून साक्षात् लक्ष्मी येथेंच वास करीत आहे असे वाटत होतें ! पृथ्वीतील सर्व राजे पराजित झाल्यामुळे हात जोडून त्याच्या पदकमलावर आपले मुकुट वाकवीत असत. त्या राजाचा शुकनास नांवाचा प्रधान होता. तो मोठा बुद्धिमान् व राज्यकारभारांत दक्ष असे. त्यानें सर्वत्र दूत ठेविले होते, त्या- मुळे कोठें थोडीशी जरी हालचाल झाली तरी ती त्याला कळल्याखेरीज राहत नसे. जिकडे तिकडे स्वस्थता केल्यामुळे राजाला कांहीं काळजी उरली नव्हती. प्रजा शांततेच्या सुखांत असली ह्मणजे राजाला मोठें भूषण असते ! तो राजा प्रसंगविशेषीं लोकांच्या भेटी घेऊन त्यांचें ह्मणणें ऐकत असे व सिंहासनावर बसून राज्यकारभारहि पहात असे. शुकनासप्रधानाने इतकी उत्तम राज्याची व्यवस्था ठेवली होती की त्यामुळे लोकांची प्रीति त्याजवर फारच जडली होती. राजाचा तारुण्यसुखांत बराच काळ गेला होता तरी संततीचें सुख त्याचे दृष्टीस पडले नव्हते, त्यामुळे त्याला सर्व गोष्टींचा तिट्कारा वाटू लागला ! त्याची विलासवती नांवाची एक पट्टराणी होती. एके दिवशी तो तिच्या मंदिरांत गेला असतां तेथें दासी उभ्या आहेत, वृद्ध स्त्रिया तिचें शांतवन करीत आहेत, व तिच्या डोळ्यांतून अश्रु वाहत असल्यामुळे तिचं लुगडें भिजले आहे, असे त्याच्या दृष्टीस पडलें ! राजास पाहतांच ती उठून उभी राहिली. राजानें तिला खाली बसवून आपणहि बसला. तेव्हां तिची ती सशोक मुद्रा पाहून राजा घाबरा झाला. मग आपल्या हाताने तिचे डोळे