पान:बाणभट्ट.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८०) तेथील राजाश्रित पंडितांकडे गेला. परंतु ' बोद्धारो मत्सरग्रस्ताः ' या भर्तृहरीच्या वचनाप्रमाणे तेथील पंडित त्याचें तेज तेथें पडूं देईनात. शेवटीं त्याने आपल्याजवळ होतें नव्हतें तें सर्व निर्वाहाकरितां विकले. एके दिवशीं तो एका तीर्थाचे कांठीं देवालयांत रुद्राभिषेकपूर्वक पूजन करीत बसला असतां तेथें तद्देशीय हीनजाति दोन स्त्रिया पाणी भरण्याकरितां आल्या व 'मी अगोदर घागर भरीन ' ह्मणून दोघींच्या शिव्यागाळी सुरू होऊन भांडण जुंपलें. शेवटीं अंगांतून रक्त निघेपर्यंत दोघींची मारामारी झाली. पुढे हा खटला राजदरबारांत गेला. तेव्हां यास कोणी साक्षी आहे काय ? असें राजाने विचारले. यावर ' तेथें एक ब्राह्मण देवपूजा करीत बसला आहे' असे त्यांनीं सांगितलें, मग राजाने दूत पाठवून त्या ब्राह्मणास तेथें आणविलें व यासंबंधी हकीकत विचारिली. त्यावेळी श्रीहर्ष गीर्वाणभाषेत ह्मणाला, . " ह्या दोघी स्त्रिया त्याठिकाणी भांडत होत्या खन्या, परंतु यांची भाषा मला येत नसल्यामुळे अपराधी कोण हे मला सांगतां येणार नाहीं. तथापि दोघींचे शब्द मी अगदी बरोबर उच्चारून दाखवितों. मग त्यांचा अर्थ काय होत असेल तो तुझी पाहून न्याय करा. नंतर राजाज्ञेवरून त्यानें दोघींचीं बोलणी पहिल्यापासून जशीचीं तशीं काश्मिरीभाषेत बोलून दाखविली. ती त्याची धारणाशक्ति पाहून राजा व सर्व सभासद थक्क होऊन राहिले ! पुढें राजाने त्याच्या भाषानुवादावरूनच निकाल करून अपराधी स्त्रियांस कमी जास्त प्रमाणानें शिक्षा दिली. नंतर राजानें श्रीहर्षास आपण कोण ? कोठील राहणार ? वगैरे प्रश्न विचारिलें. तेव्हां त्याने आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून व त्याची विद्वत्ता लक्षांत आणून माधवदेवराजानें स्वाश्रितपंडितांचा धिक्कार करून श्रीहर्षाचा मोठा सन्मान केला. मग त्याची व त्याच्या नैपधचरितकाव्याची तेथे मोठी वाहवा झाली. आणि राजाकडून व राजपंडितांकडून त्याचा तेथें सन्मान होऊन त्यास मानपत्र मिळालें ! हें त्यानें स्वतः सतराव्या सर्गाच्या शेवर्टी आपल्या काव्यास “ काश्मीरैमहिते चतुर्दशतयीं विद्यां विदद्धिर्महाकाव्ये " असें विशेषण दिले आहे, यावरून ध्वनित केले आहे. तेथें असतांना तेथील पंडितांकडून श्रीहर्पाची दाद लागेना तेव्हां त्यानें पुढीलप्रमाणे उद्गार काढले आहेतः -