पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवस्थापनाला आवश्यक अशी बारकाव्याची माहिती पण असते स्थानिक लोकांपाशीच. ह्या लोकांबरोबर काम करून त्यांचे जीवन- मान सुधारतानाच निसर्ग संपत्तीचे जतन, पुनर्निर्माण करण्याची एक पर्वणी आज आपल्यापुढे आहे. जन्मसिद्ध हक्क स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,” लोकमान्य टिळकांनी बजावले होते, आणि तो मी मिळवणारच. पण मानवाचा आणखी एक जन्मसिद्ध हक्क राज्यसंस्था निर्माण होण्याच्या पूर्वीपासूनही आहे, तो म्हणजे जीवनाला आधारभूत अशा जलाची, जंगलाची, जमिनीची उपलब्धि, आणि निकोप पर्यावरण. मानवी संस्कृतीच्या इतिहासात जस-जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तस-तसे सत्ताधीश हा सर्वात मूलभूत हक्क हिरावत गेले. विशेषतः औद्योगिक क्रान्तीनंतर. या क्रान्तीमुळे अधिकाधिक नैसर्गिक संसाधने उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल बनत गेली, आणि त्यांचा साधा, जगण्यासाठीचा वापर करण्याचा सामान्य जनतेचा हक्क नाकारण्यात येऊ लागला. भारतात अशी प्रक्रिया औद्योगिक क्रान्तीमुळे बलिष्ठ बनलेल्या इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर जोरात सुरू झाली. त्या आधीही अशा संघर्षाची शक्यता निश्चितच होती. परंतु शिवाजी महाराजांनी १६७० च्या सुमारास आपल्या अधिका-यांनी निष्कारण जुलूम करू नये म्हणून एक आज्ञापत्र काढले होते: “आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काव्या आदिकरून थोर लाकुड असावे लागते. ते आपले राज्यांत आरण्यामधे सागवानादी वृक्ष आहेत त्याचे जे आनकूल पडेल ते हुजूर लेहुन हुजूरचे परवानगीने तोडुन न्यावे. या विरहीत जे पर मुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाऊ न द्यावे. काये म्हणुन की; ही झाडे वर्षा दो वर्षानी होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरासारखी बहूत काल जतन करून वाढविली; ती झाडे तोडली यावरी त्याचे दु:खास पारावार काये? येकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारास हीत स्वल्पकालेच बुडोन नाहीसेच होते. किंबहुना धण्याचेच पदरी प्रज्या पिडणाचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे हानीही होते. या करीता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचीत यखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले. आसे तरी त्याचे धण्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचा संतोषे तोडून न्यावे.” | पण हा अपवाद असावा. १७३० साली अभय सिंग या जोधपुरच्या महाराजाने आपला राजवाडा बांधायला चुन्याची भी उघडली. तिला भरपूर इंधन हवे म्हणून जवळच्या खेजड़ली गावातली खेजडीची झाडे तोडायचा हुकुम दिला. पण ही झाडे तिथल्या बिश्नोई समाजाने पवित्र म्हणून जिवापाड जतन करून ठेवली होती. झाडे तोडणे थांबवण्याच्या प्रयत्नात जेव्हा गावच्या महिलांनी झाडाला मिठी मारून मोठ्या संख्येने प्राणार्पण केले, तेव्हा राजाने हार मानली व सर्व बिश्नोई गावातल्या खेजडीच्या झाडांना कोणीही हात लावू नये असा आदेश दिला. नंतर १७८२ साली सत्तेवर आलेल्या