पान:बलसागर (Balsagar).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काळ पुढे सरकतच होता. हिंदू स्त्रियांवरील अत्याचाराने बेभान होणारे भावे एखाद्या दलित स्त्रीवर झालेल्या अत्याचाराने बेभान होईनासे झाले. स्वातंत्र्यानंतर समतेचे युग हिदुस्थानात उगवू पाहत आहे याचा त्यांनी कधी वेध घेतलाच नाही. ते प्रामाणिक असल्याने इतर काही साहित्यिकांप्रमाणे या युगाच्या खोट्या प्रसववेदना त्यांनी कधी दाखवल्या नाहीत, हे त्यातल्या त्यात चांगलेच घडले; पण नव्या युगाची चाहूल त्यांनी घेतली असती तर निर्भयपणे फासावर चढणा-या नक्षलवाद्यात त्यांना एखाद्या नव्या 'मुक्ती' कथेचा नायक सहज दिसला असता. चितोडच्या जोहारांनी भारावून जाणा-या भाव्यांना तिनवेलीच्या किंवा वेलछीच्या ज्वाळा दिसल्या असत्या तर ? द्रौपदीची विटंबना करणारे हात जाळून टाकण्यासाठी भाव्यांनी सहदेवाला अग्नी आणायला सांगितले होते. बेलछी घडवणारे हात त्यांना दिसणे अशक्य नव्हते- ते साहित्यिक असले तरी त्यांचे रक्त उसळते होते ! उत्कटता हा तर त्यांच्या साहित्याचा प्रधान गुणधर्मच होता. शब्दसंपदा ही तर त्यांची दासी होती; पण ही सारी उत्कटता, हे सारे भाषाप्रभुत्व पुढे एकदेशी, एककेन्द्री झाले, थबकले; ४७ सालच्या पुढे सरकेनासे झाले. फाळणीने आमच्यातला एक साहित्यिक असा कायमचा घायाळ करून टाकला ! त्याच्या प्रतिभेचे गरुडपंख छाटून कापून टाकले. नाहीतर जे रक्त निर्वासितांच्या किंकाळ्यांनी तापले, जे अश्रु बलात्कारित हिंदू स्त्रीसाठी ओघळले, ते बेलछीसाठी अनावर झाल्याशिवाय राहिले नसते. भावे जटायू होते... सीतेला वाचवता वाचवता स्वत:च ते छिन्नविछिन्न होऊन जमिनीवर कोसळले. पुन्हा हा जटायू वर उठला नाही, उठू शकला नाही; हे खरे असले तरी अशा वेळी घरट्यात बसून राहिलेल्या अनेक पाखरांच्या अनेक कलापूर्ण कूजनांपेक्षा हे कोसळणे अधिक प्रामाणिक व मौलिक होते, यातही काही शंका नाही !
 सीतेसाठी छिन्नविछिन्न होऊन मरण पत्करणा-या या एका जटायूला तारीकअलीचा लेख वाचून खरोखरच काय वाटले असते ?

 जटायू भाव्यांना वाटले असते की, तारीक अली हा आपल्याकडील डाव्या मंडळींप्रमाणेच पाकिस्तान का निर्माण झाले. पाकिस्तानची ताकद कशात आहे, हे न समजलेला एकाक्ष विरोधक आहे. अंतर्गत बंडाळ्यांनी पाकिस्तान पोखरले जावो, की तेथे महागाई-बेकारी भयंकर वाढलेली असो, धर्माच्या आधारावर हे राष्ट्र अजूनही बराच काळ आपले अस्तित्व टिकवून धरल्याशिवाय राहणार नाही ! आपापसात इस्लामधर्मीयात कितीही मतभेद आणि वैर असो, हिंदुस्थानविरुद्ध नेहमीच सगळा इस्लाम एक होत राहील. आता तर मध्यपूर्वेची प्रचंड

।। बलसागर ।। ७३