पान:बलसागर (Balsagar).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिपाक येत्या २४ महिन्यांत दिसेल, असा तारीक अलींचा अंदाज आहे. दोन ‘वर्षे' न म्हणता २४ ‘महिने' असा शब्दप्रयोगही मुद्दामच केलेला जाणवतो ! वर्षे म्हटल्यावर उगाचच काल लांबल्यासारखा वाटतो आणि तारीक अलींना तर ही पाकिस्तान-विलयाची घटना जेवढ्या लवकर घडून येईल तितकी हवी असावी. यासाठी रशियन फौजांची मदत घेण्यासही त्यांची हरकत दिसत नाही. तारीक अलींचे भाकित खरे ठरते की काय हे पाहायचे. ठरले तर उत्तमच. पण आजवरचा अनुभव निराळा आहे. पाकिस्तानच्या जन्मापासून डावी मंडळी आर्थिकदृष्ट्या हा देश स्वयंपूर्ण होऊ शकत नसल्याने टिकू शकणार नाही, असे म्हणत आलेली आहेत. पण बड्या देशांच्या मदतीने आणि चालू दशकात भुत्तोंच्या अमदानीपासून मध्यपूर्वेशी नाते जोडून, पाकिस्तान टिकूनच राहिलेले आहे. तेव्हा तारीक अलींचा आशावाद कागदावरच राहण्याची शक्यता अधिक. असे जरी असले तरी नवी दिल्लीची हवा बदलू लागलेली आहे, गरम वारे सुरू होण्याची शक्यता आहे, हा टाइम्समधील जोडलेखांचा गभितार्थ नोंद घेण्यासारखा आहे.

 हे जोडलेख, विशेषतः तारीक ऊलींचा लेख, पु. भा. भाव्यांनी वाचला असता तर ? ते शक्य नव्हते. कारण १० ऑगस्टच्या आधीपासूनच ते मृत्यूच्या वाटेवर होते. काही वाचण्याच्या, व्यवत करण्याच्या अवस्थेत ते राहिले नव्हते. पण पाकिस्तान मोडले पाहिजे असे सातत्याने, कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता सांगणारा हा एकमेव साहित्यिक, तारीक अलीचे भाकित वाचून सुखाः वला असता. भावे तर पाकिस्तानला पाकिस्तान ही म्हणत नसत. त्यांच्या दृष्टीने ते पापस्तानच होते. हे पाकिस्तान जन्मले आणि भाव्यांमधला साहित्यिक तेव्हापासूनच आपल्याला दिसेनासा झाला. 'मुक्ती सतरावे वर्ष, ' ' फुलवा' यासारख्या कथा नंतर त्यांनी आपल्याला दिल्या नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी जे लिहिले त्यावर पाकिस्तानच्या अस्तित्वाची दाट छाया उमटत राहिली. फाळणीचा घाव ते कधी ही विसरू शकले नाहीत. ही जखम त्यांच्या लिखाणातून, भाषणातून सतत वाहत होती. मग ते राजस्थानचे प्रवासवर्णन असो, निर्वासित हिंदू स्त्रीवर लिहि ले ली दिवाळी अंकातली एखादी कथा असो किंवा दंगलीनिमित्त लिहिलेला एखादा लेख असो. साहित्यिक हाही शेवटी एक माणूसच असतो. एखादा अनुभव त्याच्या अगदी जिव्हारी झोंबतो. त्याचे भावजीवनच यामुळे उन्मळून जाते. फाळणीच्या अनुभवाने भाव्यांवर असाच आघात केला. उत्कटता कमी झाली नाही; पण त्यांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभापद्मिनी मात्र फाळणीच्या आगडोंवात जळून गेली ! त्यांच्यातल्या कथाकामिनीने जणू जोहारच करून टाकला !

।। बलसागर ।। ७२