पान:बलसागर (Balsagar).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 श्रीगुरुजी

 

 सत्तेपासून अलिप्त असणारा पण सत्तेवर अंकुश ठेवू शकणारा यतीवर्ग ही भारतीयांची राजकारणातली, समाजरचनेतली एक प्राचीन काळापासून चालत आलेली आवडती कल्पना आहे. या कल्पनेचा पुरस्कार अलिकडच्या काळात गांधीजींनी केलेला असला तरी ही कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी कुणी पराकाष्ठेचे प्रयत्न केले असतील तर ते श्री. गोळवलकर गुरुजी यांनी. काँग्रेसचे लोकसेवक संघात रूपांतर व्हावे अशी गांधीजींची अखेरची इच्छा होती. हे लोकसेवक म्हणजे सूत कातत बसणारे कुणी निरुपद्रवी प्राणी राहावेत असे गांधीजींना खासच वाटत नव्हते. खेडोपाडी, जेथे कुठे अन्याय आणि अनाचार, हिंसा आणि अत्याचार यांची परिसीमा झाली असेल तेथे या लोकसेवकांनी धावून जावे, लोकांना प्रतिकाराचे शिक्षण द्यावे, उद्योगाला लावावे, 'शहाणे करून सोडावे ! सकळ जन' अशीच त्यांची या लोकसेवकांकडून अपेक्षा होती. म्हणून सत्ता पायाशी लोळण घेत असतानाही शेवटी त्यांनी नौआखलीचा मार्ग पत्करला. दुरून सत्तेवर अंकुश चालवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसची वाढ प्रथमपासून अशी होत आलेली होती की, सत्तास्थानापासून दूर राहणे बहुसंख्य काँग्रेसजनांच्या प्रवृत्तीत बसणारे नव्हते. त्यामुळे गांधीजींचा लोकसेवक संघाचा आदर्श कागदावरच राहिला, कुणाही प्रथम श्रेणीच्या काँग्रेसजनाने सत्ता सोडून लोकसेवकाचा कंटकाकीर्ण मार्ग स्वीकारला नाही. सतेच्या केन्द्राकडे बहुसंख्य लहानथोर गांधीवादी इतक्या वेगाने धावत सुटले, की 'सेवा' हा शब्द लवकरच या वर्तुळात एक टवाळीचा विषय ठरला. विधायक कार्यकर्त्यांना उद्देशून वल्लभभाईंनीच म्हटले

।। बलसागर ।। १२२