पान:बलसागर (Balsagar).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते की, या सर्व गांधीजींच्या विधवा आहेत. नेहरूंना तर या गांधी कल्पनेचे वल्लभभाईइतकेही आकर्षण नव्हते. त्यामुळे सर्व सेवा संघ किंवा इतर सर्वोदयी संस्था यांच्या रूपाने गांधीप्रणित लोकसेवक संघाचे काही पुसटते दर्शन घडत असले तरी प्रत्यक्षात गांधीजींबरोबरच गांधीजींच्या लोकसेवक संघाचे अस्तित्वही संपले असे मानावयास हरकत नाही.

 श्री. गोळवलकर गुरुजींशिवाय अखिल भारतात अन्य कुणीही या आदर्शाच्या जवळपास पोचणारी व्यापक आणि मजबूत सेवा संघटना आजवर उभी करू शकलेला नाही. या दृष्टीने वरवर पाहता वेगवेगळ्या वाटणाऱ्या या दोन प्रवाहांचा संगम घडून येण्यासारखा आहे. गुरुजींनी गांधीजींच्या कल्पनेचे उघडउघडच स्वागत केलेले होते. हळूहळू श्रेष्ठ कर्तृत्वाची माणसे संघकार्यातून मोकळी करून समाजजीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात स्वतंत्र कार्य करण्यासाठी सोडून दिलेली होती. या व्यक्तींवर व त्यांनी उभारलेल्या कार्यावर गुरुजींची संघविचारांची छाप अवश्य होती. पण यापलिकडे वर्चस्व गाजविण्याची, सत्ता लादण्याची धडपड संघाकडून होत होती हा आरोप, ज्यांना संघविद्येतला ओनामाही कळला नाही असेच महाभाग करू शकतात. श्यामाप्रसादांना त्यांनी जनसंघ स्थापनेसाठी प्रवृत्त केले. काही कार्यकर्ते त्यांना दिले. यापलिकडे सत्तेच्या उलाढालीत त्यांना फारसा रस नव्हता. उलट पंजाबमधील भाषिक प्रश्न, चातुर्वण्य, भाषावर प्रांतरचना इत्यादी विषयांवर त्यांनी अशा भूमिका प्रकटपणे घेतल्या की, जनसंघ अडचणीतच यावा. पण गुरुजींना याची पर्वा नव्हती. कारण कुठलीही राष्ट्रवादी सत्ता त्यांना मान्य होती. राष्ट्रजीवनाचा एकूण स्तर आपल्या शाखोपशाखांद्वारे उंचावणे हे त्यांनी आपले जीवनकार्य मानले होते व यातूनच एक समर्थ, शक्तिसंपन्न भारत उभा राहील, प्राचीन वैभव या भूमीला लाभेल अशी त्यांची श्रद्धा होती. सत्ता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हाती घेऊन हे साधण्यापेक्षा सत्तेवर संस्कारसंपन्न व्यक्ती व गट आणून आपण आर्य चाणक्याप्रमाणे किंवा विद्यारण्यांप्रमाणे निवृत्त व्हावे, एकेका जबाबदारीतून मुक्त व्हावे असा त्यांचा स्वाभाविक कल होता. संघस्वयंसेवकांमध्येही अशाच स्वरूपाचे संस्कार दैनंदिन शाखांतून होत होते. 'पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते–' सत्ताभाव जागृत करणारी ही संघप्रार्थना नाही. गांधीजींप्रमाणेच 'नाहं कामये राज्यम्' या प्रवृत्तीचे गुरुजी एक यती होते. यतीवर्गाने निष्काम कर्माचरणाने समाजधारणा करावी, हा प्राचीन भारतीय आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. हा आदर्श गुरुजींच्या उत्तराधीकार्यांनी जोपासला, वाढवला तर गांधीजींना जे जमले नाही, परिस्थितीमुळे त्यांना जे अपयश आले, ते धुवून काढण्याची एक ऐतिहासिक संधी संघाला लाभेल, जगासमोर दंडहीन समाजक्रांतीचा एक नवाच प्रयोग उभा राहील.

।। बलसागर ।। १२३