पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उभे राहून त्यांनी वधू-वरांवर अक्षता टाकल्या. लग्न संपताच उभ्या-उभ्याच पोशाख-पानसुपारी व हात अत्तर घेऊन स्वारी परत गेली. जाताना मी वरातीला जरूर येईन म्हणून महाराज म्हणाले. त्यावर मी विनंती केली की, वरात फार अपरात्री निघेल, करिता सरकारनी श्रम व त्रास घेऊ नये, असे वारंवार सांगितले तेव्हा बरे म्हणून स्वारी गेली. लवाजम्याचे सर्व सामान, मी विनंती करताच फुकट देण्याबद्दल महाराजांनी तोंडी हुकूम दिला.” आपल्या मुलीच्या विवाहावेळी शाहू महाराजांनी दाखवलेला दिलदारपणा नानासाहेबांनी येथे प्रांजळपणे अधोरेखित केला आहे.
 याचप्रमाणे बडोद्याच्या राज्यकारभारासंदर्भात शाहू महाराजांनी दिलदारपणे दिलेली कबुली आजही आपल्यासाठी 'दिशादर्शक' आहे. या संदर्भात नानासाहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “आमच्या राज्यकारभारातील उत्तम राज्यकारभार पाहून कोल्हापूरचे महाराज म्हणत असत की, तुमच्या राज्यकारभारास उत्तम सर्कशीचा मोठा तंबू, त्यामध्ये खुर्च्या, बाके, रिंगा वगैरे सामान, उत्तम रिंगमास्तर व काम करणारी उत्तम जनावरे व खिलाडी लागतात; परंतु आमचा राज्यकारभार म्हणजे माळावरील कोल्हाट्याचा खेळ. नुसते ढोलके वाजविले की, काम झाले. आम्हाला तुमची केव्हाही बरोबरी करता येणार नाही.” यावरून राजर्षी शाहूंसमोर सयाजीराव महाराजांचा 'आदर्श' होता हे स्पष्ट होते.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४०