पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मित्रांमध्ये वाद झाला. त्यामुळे पुण्यातील युरोपियन मंडळींमध्ये खळबळ उडाली. ही बाब सयाजीराव महाराजांच्या कानावर गेली. पोलोचा संघ बडोद्याला परतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
 पुण्यात युवराज इतर संघापासून वेगळे वास्तव्यास असल्याने या प्रकरणाशी इतरांचा संबंध नव्हता; परंतु बडोद्यातील चौकशीदरम्यान संपूर्ण संघाला या प्रकरणासंदर्भात दोष देण्यात आला. याचे वाईट वाटल्यामुळे नानासाहेबांनी सेक्रेटरीपदाचा राजीनामा दिला. कालांतराने नानासाहेबांप्रमाणेच अन्य सदस्यांनीही पोलो खेळातून अंग काढून घेतले. परिणामी फत्तेसिंगरावांच्या मृत्यूनंतर पोलोचा कारखाना बंद करण्यात आला. पुढे १९२४ मध्ये नानासाहेब ऑफिशिएटिंग जनरल पदावर कार्यरत असताना महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या नेतृत्वाखाली पोलोचा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. नानासाहेब आणि मेजर भाऊसाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेसिंगरावांचे 'पुत्र प्रतापसिंह उत्तम पोलो खेळण्यास शिकले.
बडोदा राजपरिवार आणि नानासाहेब
 १६ डिसेंबर १९०४ रोजी नानासाहेबांच्या सात वर्षांच्या मुलाचे तापाच्या आजाराने निधन झाले. या मुलावर फत्तेसिंगरावांचा विशेष जीव होता. यावेळी नानासाहेबांचे सांत्वन करताना फत्तेसिंगराव म्हणाले, “ शिंदे, माझा मुलगा आज वारला.मला त्याबद्दल किती दुःख होत आहे हे सांगता येत नाही."

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १८