Jump to content

पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देखरेख करणे शक्य होत नव्हते. शेवटी त्यांच्या शिफारशीनुसार नानासाहेबांची सेक्रेटरीपदी नेमणूक करण्यात आली. याच दरम्यान ऑक्सफर्ड येथून शिक्षण संपवून परतलेल्या युवराज फत्तेसिंगरावांना पोलोची आवड असल्यामुळे बडोद्यात हा खेळ रोज खेळला जाऊ लागला.
 फत्तेसिंगरावांनी सयाजीराव महाराजांना विनंती करून पोलो खेळणाऱ्यांसाठी १६ नवीन चांगले घोडे खरेदी केले, तर स्वतः साठी ४ भारी किमतीचे घोडे मागवले. रोजच्या सरावामुळे युवराज फत्तेसिंगराव, नानासाहेब, कॅप्टन जनार्दन, कॅप्टन दादासाहेब गायकवाड, सरदार ताजमहंमद, अप्पासाहेब सावंत, बलदेव प्रसाद पाठक, माधवराव जाधव व भाऊसाहेब गायकवाड या पोलो खेळाडूंचा चांगला संघ तयार झाला. १९०२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या १० रॉयल युरोपियन रिसाल्याच्या पोलो टीमशी सामना खेळण्याकरिता सयाजीराव महाराजांनी बडोद्याकडून हा संघ पाठवला.

 १९०३ व १९०४ मध्ये पुणे येथे झालेल्या पोलोच्या सामन्यांमध्ये भाग घेण्यासाठी फत्तेसिंगराव बडोद्याची पोलो टीम घेऊन गेले. दोन्ही वर्षी बडोदा संघाला पराभव पत्करावा लागला. या दौऱ्यादरम्यान युवराज फत्तेसिंगराव आपल्या संघापासून वेगळ्या ठिकाणी राहत. त्यांच्या वास्तव्यादरम्यान अनेक युरोपियन अंमलदार त्यांचे मित्र बनले होते. एके दिवशी पुणे जिमखान्यात फत्तेसिंगराव आणि त्यांच्या युरोपियन

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १७