पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
निमित्त

आम्ही गावोगावच्या आया-मावश्या-बहिणींबरोबर बचतगटाचं काम करायला लागलो.
सभासद, गटप्रमुख यांची प्रशिक्षणे घ्यायला लागलो.
त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी त्यांनी सुचवल्या आणि मग त्याप्रमाणे आम्ही साहित्य बनवत गेलो.
त्या म्हणाल्या, पुस्तकावरनं सांगावा द्यायचा तर द्या, पन ते सोप्प हवं --- म्हणून आम्ही पुस्तिका सोपी केली.
निस्तं सोप्प न्हवं; त्याची लई खिटखट पन नको----म्हणून आम्ही ती सुटसुटीत केली.
लिहाया कटाळा येतो, सवयीचं नसतं म्हणाल्या --- म्हणून X ✓ अशी उत्तरं लिहायला सांगितली.
बाया परशिक्षनात मिस्त्री लावल्यागत गुळणा धरून बसत्यात --- म्हणून प्रशिक्षण खेळीमेळीचं केलं.
परत्येकीचा इचार येगळा असतो ---- म्हणून उत्तरांवर गटात चर्चा घ्यायचं ठरलं.
परशिक्षन खेळावाणी घेतलं; लिहाया कमी केलं---- म्हणून तरी सारं उमगलं. ते हसत खेळत झालं.
ते तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून हे पुस्तक लिहिलं. तुम्हीही हे करून पाहणार ना ?

तुमचेच,

गंगुताई, भारती, सोपान, आशा, शैला, विवेक, सुरेखा, हिरा, हेमंत आणि सा-या गटांच्या सदस्या
(ज्ञान प्रबोधिनीच्या शिवगंगा व गुंजवणी खोरे विकास योजनेतील सहभागी सदस्य, जि. पुणे)

मनोगत

 दर महिन्याचा कुटुंबाचा जमा-खर्च पाहताना बहुतांश महिला त्यांच्याजवळच्या उपजत अशा शहाणपणाचा वापर करताना दिसतात. तसेच गटाचा हिशोब ठेवतानाही त्या व्यवहारातील गणिताचं तंत्र वापरतात. पण कुटुंबातील व्यवहार व गटातील व्यवहार या दोन्हीतही गणिताच्या तंत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीचा आशयही हवा. गटांमधून काम करताना ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आणि जेवढ्या आवश्यक तेवढ्या प्रमाणात गटात कशा येतील हा महत्त्वाचा प्रश्न प्रशिक्षणे घेताना आम्हाला जाणवला.
 ज्ञान प्रबोधिनीतील क्षेत्र कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेत असतानाच चालना, चैतन्य, बाएफ, सोस्वा, पॅक्स कार्यक्रमांतर्गत संस्थांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे घेतली. त्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षणाचे साहित्य तयार केले, वापरले, विविध संस्थांमधून आलेल्या प्रतिनिधींनी प्रातिनिधिक प्रश्न व व्यावहारिक अडचणी सांगितल्या. गावपातळीवरील महिलांबरोबर काम करताना, त्यांची प्रशिक्षणे घेताना कोणत्या प्रकारच्या साहित्याची गरज आहे हे आम्हाला प्रशिक्षण घेताना समजले आणि त्याच्याच संकलनातून ही प्रशिक्षण पुस्तिका तयार झाली.
 हे प्रशिक्षण साहित्य मागणीनुसार व प्रशिक्षकांशी चर्चा करून केलेले असल्याने ते जास्तीत जास्त गरजेप्रमाणे बनवलेले आहे. बचतगट चळवळींमधील चांगल्या सवयींवर चर्चा होऊन नकारात्मक गोष्टी टाळण्याकडे गटाचा कल ठेवण्याकरिता प्रशिक्षणामध्ये चर्चेला महत्त्व आहे. प्रशिक्षकाने ही चर्चा चांगल्या वातावरणात घडवून आणावी. नकारात्मक गोष्टींवरील चर्चा टाळू नयेत तर त्यावर सर्वांच्यात विचारांची देवाण-घेवाण घडवून आणून गटाने निष्कर्षाप्रत यावे. प्रत्येक प्रशिक्षणानंतर चांगला समारोप होईल याची प्रशिक्षकाने काळजी घ्यावी.
 सर्वात शेवटी सभासद, गटप्रमुख, संघटिका, कार्यकर्ते या बचतगट चळवळीच्या साखळीतील प्रत्येक दुव्याची गटासंबंधी जाणीव समृद्ध व्हावी आणि प्रत्येकानेच संपूर्ण गटाला त्याद्वारे योग्य दिशेला नेण्यासाठी या समृद्ध जाणिवेचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात.

आपल्याच,
सुवर्णा गोखले
बागेश्री पोंक्षे