पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक
NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT
महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय
Maharashtra Regional 0ffice
 
54, वेलेस्ली रोड, पो.बा.क्र. 5. शिवाजीनगर
54, wellesley Road, P.B.No.5, Shivajiilagar
 
पुणे - 411 005
PUNE -4110 005
 
25511083, 25500100 1

फैक्स / Fax : (020)25512250 ॥ ई-मेल (E-Mail : nabpun@dataone.in


शुभेच्छा

 ग्रामीण भागातील गरीब जनतेला सुलभतेने कर्ज उपलब्ध व्हावे व त्यांची सावकाराच्या पाशातून मुक्तता व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँकेने (नाबार्ड) १९९२ साली स्वयं साहाय्यता गट बँक जोडणी कार्यक्रम भारतात सुरू केला. गेल्या दीड दशकामध्ये या कार्यक्रमाने उत्तुंग भरारी घेतली असून सर्व जगभर सर्वात मोठा सूक्ष्म ऋण कार्यक्रम म्हणून ख्याती झाली आहे.
 देशामध्ये मार्च २००७ अखेर २९ लाखांच्यावर गटांना बँकांनी ११,९७५ कोटी कर्ज वाटप केले आहे. १९९२ साली लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमाद्वारे अंदाजे ४ कोटी कुटुंबांना व २० कोटी गरीबांना आपल्या अडीअडचणीला व कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यवसायाला सहजगत्या बँक कर्जाचा लाभ मिळत आहे.
 या कार्यक्रमाचे यश नाबार्डने व इतर अनेक संस्थांनी केलेल्या अभ्यासातून व संशोधनांतून सिध्द झाले आहे. ज्या गावांमध्ये बहुसंख्येने गट आहेत त्या गावातील सावकारी संपुष्टात आली आहे. जवळपास ९० टक्के गट महिलांचे आहेत. दवाखाना व मुलांचे शिक्षण यासाठी प्रामुख्याने महिला गटातून कर्ज घेतात असे दिसून आले आहे. प्राथमिक गरजा भागल्यानंतर शेती विकास, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व इतर छोटे उद्योग व्यवसाय यासाठी बँक कर्ज घेऊन गावातील महिलांनी आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लावला आहे. यामुळे महिलांचे कुटुंबातील व समाजातील स्थान उंचावले आहे. स्वयं साहाय्यता गट चळवळीद्वारे ग्रामीण भागात एक प्रकारे मूक सामाजिक व आर्थिक क्रांती घडत आहे.
 स्वयं साहाय्यता गट ज्या वेगाने वाढत आहेत ते पाहता संख्यात्मक वाढीबरोबर गुणवत्तेवरही भर देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नाबार्ड, बँका, स्वयं सेवाभावी संस्था व शासन आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. गटांची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रशिक्षण त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शक पुस्तकांची आवश्यकता आहे.
 ज्ञान प्रबोधिनी या महाराष्ट्रातील नामांकित संस्थेने गटसभासद, गटप्रमुख व संघटिका यांच्यासाठी प्रशिक्षण पुस्तिका तयार केली आहे. त्यांच्या शैक्षणिक पातळीची जाणीव ठेऊन पुस्तिकेची रचना केली आहे. ज्ञान प्रबोधिनीचे गट निर्मिती व संवर्धनाचे अनुभव व गटामध्ये पुस्तिकेतील पाठांचे प्रत्यक्ष प्रयोग यामुळे ही पुस्तिका अतिशय उपयुक्त झाली आहे. ज्ञान प्रबोधिनीमध्ये स्वयं साहाय्यता गटांचे काम करणा-या सुवर्णा गोखले व बागेश्री पोंक्षे यांचे ही पुस्तिका तयार करण्यामागे प्रयत्न व चिकाटी प्रशंसनीय आहे. नाबार्डने ह्या पुस्तिकेसाठी आर्थिक मदत केली आहे. ही पुस्तिका इतर भाषांमध्येही प्रकाशित व्हावी अशी अपेक्षा आहे.

श्री. सुरेश डेरे

उप महाव्यवस्थापक

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक

महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे.