पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रशिक्षकांसाठी हितगुज

पुस्तिकेतील प्रशिक्षणे तीन स्तरांवरील आहेत. टप्पा १, २ व ३ म्हणजे सभासद प्रशिक्षणे, गटप्रमुख प्रशिक्षणे व संघटिकेसाठीची प्रशिक्षणे. सभासद व गटप्रमुखांबरोबर संघटिकेसाठीही प्रशिक्षणांची गरज असते.

तयारी अशी करा

प्रशिक्षकांनी प्रशिक्षण घेण्यापूर्वी स्वत: प्रशिक्षणातील उदाहरणे सोडवावीत. एकदम प्रशिक्षणाला सुरुवात करू नये. ती सोडवताना कुठल्या विधानाला कुठला अनुभव सांगायचा याचे नियोजन करावे, म्हणजे प्रशिक्षण प्रभावी होईल. हे अनुभव स्थानिक असावेत, यामुळे त्याला जिवंतपणा येईल. या प्रशिक्षण साहित्याचा उपयोग आपण सढळ हाताने करावा. प्रशिक्षणाच्या सूचना देताना त्या होकारात्मक भाषेत द्याव्यात.

उदा. प्रशिक्षणे घेताना :-
‘इकडे लक्ष द्या' असे म्हणावे. 'गप्प बसा' असे म्हणू नये.
पुस्तक असे वापरा -

बहुतेक ठिकाणी प्रशिक्षणातील धडे उजव्या पानावर दिले आहेत. त्यांची उत्तरे किंवा त्या विधानांवरील चर्चेचे मुद्दे हे डावीकडील पानावर दिलेले आहेत. या मुद्यांचा आधार प्रशिक्षकाला घेता येईल.
या साहित्याची अशी रचना केली आहे की त्याची पाने झेरॉक्स करून आपल्याला वापरता येतील. प्रौढ सदस्यांच्या शिक्षणात प्रत्येक व्यक्ती ही अनुभवांमधून शिकते. त्यानुसार मते बनवते, वागते. त्यातून तिचा दृष्टिकोन बनतो, हे गृहित धरावे. म्हणून प्रत्येकीचा दृष्टिकोन सर्वांसमोर यायला हवा. या अनुभवांच्या देवाण-घेवाणीतून प्रशिक्षणार्थी गटाला शिकता यावे, यासाठी प्रशिक्षकाने प्रत्येक व्यक्ती प्रशिक्षणांमध्ये सहभागी होईल हे पाहावे.
(पुरूष अथवा स्त्री या दोन्हींसाठी प्रशिक्षक असा एकच शब्द वापरला आहे.)

* * * * *