पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
टप्पा १ : सभासद प्रशिक्षण

बचतगट सभासदांना गटाची संकल्पना स्पष्ट व्हावी यासाठी सभासद प्रशिक्षणांची योजना केलेली आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी असणान्यांनाही सहजपणाने सोडवता येतील अशी, मोठ्या अक्षरातील, 'होय-नाही सांगा, ‘बरोबर-चूक' खूण करा अशी प्रशिक्षणे आहेत. ही प्रशिक्षणे सोपी, सुटसुटीत असली, तरीही मूलभूत पायाच्या गोष्टींवर सविस्तर चर्चा घडवून आणणारी आहेत. ही वारंवार, सातत्याने घ्यावीत. पुरेसा वेळ देऊन घ्यावीत. एक प्रशिक्षण अडीच ते तीन तास घ्यावे. एकाच दिवसात सर्व उरकू नये. कारण यातील अनेक मूल्ये ही चर्चेने सभासदांपर्यंत पोहोचणे व ती अंगीकारली जाणे यात खूप अंतर असू शकते, त्यामुळेच गट जुना झाला तरी संकल्पनात्मक प्रशिक्षणे घेत राहावी लागतात. प्रशिक्षणांमध्ये दिलेल्या विधानांमधून वाटणारा अर्थ, बचतगटात प्रत्यक्षात घडणा-या घटनांचा अर्थ व अपेक्षित अर्थ यावर प्रशिक्षण घेताना प्रशिक्षकाने चर्चा करावी. सभासदांच्या अनेक गुणांवर, चांगल्या सवयींवर, विविध गैरसमजुतींवर साधक-बाधक चर्चा होऊन सभासदांना योग्य तेच निवडण्यासाठी या चर्चेचा उपयोग व्हावा,यासाठी ही विधाने आहेत.

टप्पा १ मधील सभासद प्रशिक्षणात खालील ५ विषयांवर चर्चा क्रमशः घडवाव्यात.

१ पैसे असे खेळतात.....

२ सावकारापेक्षा गटच बरा

३ योग्य पर्याय निवडा

४ बरोबर विधाने ओळखा

५ चूक कोणाची?

                        *****