पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना

 महिला सबलीकरणात जे स्थान बचत गटाचे आहे ते बचतगट चळवळी मध्ये ‘आर्थिक साक्षरता' या विषयाचे महत्व आहे. महिला आर्थिक साक्षर नसल्यामुळे त्या आर्थिक निर्णय प्रक्रियेच्या बाहेर असतात. विकास प्रक्रियेतील महिलांचा गुणात्मक सहभाग वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरता पण फारच गरजेची आहे. आर्थिक साक्षरता म्हणताना त्याला अनेक पैलू आहेत, त्यापैकी बचत गटांसाठी बँकेचे व्यवहार करण्याकरता लागणारी पैशाविषयीची जी किमान माहिती लागते, तिला आपण या पुस्तिके पुरती आर्थिक साक्षरता म्हणूया !.
 अनेकदा ग्रामीण महिलांना व्यावहारिक जगात लागणारे आर्थिक शहाणपण असते पण ग्रामीण महिला कमी शिकलेली असल्याने कागदपत्रां पासून ती दूर राहते. म्हणून ग्रामीण महिलेला आर्थिक साक्षर करणे ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षर होण्याच्या या प्रक्रियेत त्यांनी बँक ही रचना तपशिलात माहिती करून घेणे गरजेचे आहे. बँकेसोबत करायच्या व्यवहारांबद्दल माहिती करून घ्यायला हवी. बँकेत जाण्याचा सराव नसल्यामुळे गटातील महिलांमध्ये खूप गैरसमज असतात. त्याबद्दलचे पुरेसे आणि अचूक स्पष्टीकरण त्यांना हवे असते असे लक्षात आले. बचत गटातील ग्रामीण महिला बँकेतील व्यवहार अनुभवातून शिकत असल्यामुळे कधी-कधी त्यांच्याकडून चूका होतात आणि त्याची कदाचित फार मोठी किंमत गटाला मोजावी लागते. यासाठी बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी या पुस्तकाची रचना केली आहे..
 ज्ञान प्रबोधिनीने रिझर्व बँकेच्या अमृत महोत्सवा निमित्त सेंट्रल बँकेच्या वेळू शाखेच्या मदतीने भोर तालुक्यातील खोपी हे गाव १००% , अर्थसाक्षर केले म्हणजेच ‘इन्क्लूजन' मध्ये आणले. या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक घरातल्या किमान एका व्यक्तीचे तरी बँक खाते काढले, बँक या विषयावर गावामध्ये वारंवार चर्चा करून माहिती देण्यात आली, त्यावेळी ज्या गोष्टी चर्चेमध्ये लक्षात आल्या त्यावरून ही पुस्तिका तयार करण्यात आली. पहिल्यांदाच बँक रचनेत पाऊल टाकणा-या व्यक्तीसाठी ही पुस्तिका आहे.
 या पुस्तिकेत ग्रामीण भागात बँकेसोबत बचत गटांचे काम करताना आलेले अनुभव आहेत. थोड्याफार फरकाने हे अनुभव सगळीकडेच येतात असे लक्षात आले. त्यामुळे या अनुभवांद्वारे लक्षात आलेल्या गोष्टींसाठीचे काही पाठ तयार केले. ते नक्कीच बचतगटांच्या कार्यकर्त्यांना उपयोगी पडतील. हे पाठ बचतगटातील सभासदांच्या प्रशिक्षणासाठी वापरले तर प्रत्यक्ष बँकेशी व्यवहार करताना महिलांची पुरेशी तयारी होईल असे वाटते. बँकेत पाऊल टाकण्या पूर्वी त्यांना ही माहीत असेल तर आत्मविश्वासाने व्यवहार करून ग्रामीण महिला बँकेची चांगली ग्राहक बनेल यासाठीचा हा प्रयत्न!.

*****