पान:फुलाचा प्रयोग.djvu/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ह्यांचा थोडा अभ्यास केला का ? परंतु ह्या सर्वांचे आदिकारण काय ? सारी कोडी सुटली का ? मी निःशंक झालो का ? काय मिळविले मी ? विश्वाचे कोडेही मला सुटले नाही व सुखांचा उपभोगही मी घेतला नाही. माझे जीवन रिकामे आहे, शून्य आहे. उगीच इतकी वर्षे येथे अंधारात घालविली. फुले हुंगली नाहीत, पाण्यात डुंबलो नाही ; टेकडीवर चढलो नाही, चांदण्यात फिरलो नाही ; नीट खाल्ले नाही, नीट प्यायलो नाही ; ना ज्ञान, ना सुख; ना मनाचे समाधान, ना देहाचे. फुकट, - फुकट गेला सारा जन्म. फुकट गेली सारी वर्षे. "
 किती तरी वेळ अशा विचारात तो उभा होता. तिकडे कोंबडा आरवला. पहाट झाली. कोणी तरी खाली येऊन हाका मारीत होते.- कोण होते ? माधवाकडे अभ्यासासाठी येणारा तो एक विद्यार्थी होता :- त्याच्या हाकांनी माधव भानावर आला. परंतु तो रागावला. ह्या हाकांमुळे पुन्हा आपण प्रत्यक्ष सृष्टीत आलो म्हणून त्याला वाईट वाटले.. कसा विचारात रंगलो होतो, परंतु हा आला हाका मारीत ! " असे म्हणत माधव खाली गेला.
 " काय आहे रे ? कशाला पहाटे बोंबलत आलास ? मी विचाराच्या स्वर्गात होतो. तू माझी समाधी भंगलीस, तंद्री मोडलीस. जा. चालता हो जा. आज अनध्याय. आज नको वाचन. फुकट आहे हे वाचन- बिचन.. काही अर्थ नाही. " असे दारात उभा राहून माधव म्हणाला.
 शिष्य नम्रपणे म्हणाला, " आज तुम्ही उपनिषदे माझ्याबरोबर वाचणार होतेत. चला वर . रागावू नका. तुमच्या ज्ञानसिंधूतील एक कण तरी मला मिळू दे. "
 गुरु-शिष्य वर आले. परंतु माधव काही बोलेना. शिष्य तसाच तेथे पुस्तक उघडून बसला होता. बाहेर चांगला प्रकाश पडला. सूर्यनारायण वर आला. गावातील व्यवहार सुरू झाला. लोक हिंडू-फिरू लागले.. आज बाजाराचा दिवस होता. खेड्या-पाड्यांतील लोक गाड्या घेऊन येत होते. भाजी-पाल्याच्या, धान्याच्या, फळांच्या, उसाच्या गाड्या येत होत्या.


असमाधान * ५९