पान:फुलाचा प्रयोग.djvu/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ कळी आली ? छान. कळीच्या हाताचा गुण. कळीनं कळी आणिली. आता ती फुलेलं. तिच्या पाकळ्यांवर सोनेरी छटा दिसतील. प्रयोग यशस्वी होईल. " फुला नाचत म्हणाला.
 त्या दिवशो कळी मोठ्या उत्सुकतेने भेटण्यास आली होती. झाडावरची कळी अर्धवट फुलली होती. सोनेरी छटा दिसत होत्या. केव्हा एकदा ही - बातमी देऊ असे तिला झाले होते.
 " कळ्ये, तुझे तोंड आज फुलले आहे. " फुला म्हणाला.
 " कारण कुंडीतील कळी फुलणार आहे, आज रात्री तो फुलेल. पूर्णपणे फुलेल. आता अर्धवट फुलली आहे. सोनेरी छटा दिसत आहेत. निळ्या ढगांवर सोनेरी किरण तशी ती कळी दिसत आहे."
 “ छान छान. माझा प्रयोग यशस्वी झाला. कळ्ये, किती तू चांगली; किती हुशार. आता असं कर. ती कुंडी घोड्याच्या गाडीत घाल व घेऊन जा. त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी ने. ती तारीख जवळच आहे; हे फूल फुललं -तरी दोन महिने कोमेजणार नाही. तू आपली रोजनिशी बरोबर ने. शास्त्रज्ञ विचारतील. त्यांच्या हातात रोजनिशी दे. "
 " परंतु बाबा कसे जाऊ देतील ?"
 “ त्यांना विचारू नकोस. माझ्याकडे येत होतीस तो का त्यांना विचारून ? तू पाप थोडेच करीत आहेस ?"
 “ बरे मी जाईन."
 " परंतु कुंडी नेण्यापूर्वी मला दाखवशील का ?"
 " दाखवीन शिपाई माझे ऐकतील. रात्री बारानंतर घेऊन जाईन. देईन कोणाच्या डोक्यावर रात्री आणोन हा. जाते मी. "
 तो पाहुणा सारे ऐकत होता. “आज रात्री फुलणार का ? ठीक. " असे म्हणत तो पटकन निघून गेला.
 मध्यरात्र झाली. गस्तवाले गस्त घालीत होते. बाराचे ठोके पडले. " आल बेल बराबर है." अशा आरोळ्या तुरुंगाच्या सर्व भागांतून झाल्या. ढब्बूसाहेब झोपले होते. परंतु कळी उठलो. तिने दोन शिपाई व दोन वॉर्डर बरोबर घेतले. तिने खोली उघडली. त्या दोन वॉर्डरांनी ती कुंडी धरली. शिपायांच्या हातात कंदील होते. फुला दारात उभा होता.

तुरुंगातील प्रयोग ४१