पान:फुलाचा प्रयोग.djvu/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रागीट होते. परंतु मुलीसमोर त्यांचा राग पळे. त्यांचा निश्चय कळीसमोर राहात नसे. कळी त्यांना हसवी.
 कळी आता मोठी झाली होती. चौदा-पंधरा वर्षांची ती असेल. ती सुंदर होती. तिचे केस फारच सुंदर होते. तुरुंगातील बगीच्यामधील फुले ती केसांत घाली. आकाशात तारे शोभावे तशी ती फले तिच्या काळ्याभोर केसांत शोभत आणि कळीचे हसणे किती गोड होते. त्या गोड हसण्याने तिने सान्या जगाला जिंकून घेतले असते.
 "कळ्ये, तू अजून कळी आहेस. तरी तुझे हसणे इतके गोड. मग फुललोस म्हणजे तुझे हसणे किती गोड असेल ? " पिता म्हणाला.
 " बाबा, मला कळीच राहू दे ! " ती म्हणाली.
 " कळीचे रंग फुलल्यावर दिसतात. कळीचा गंध फुलल्यावर दरवळतो. तुझे रंग, तुझा गंध नकोत का प्रकट व्हायला ? " पित्याने प्रेमाने विचारले. " कळीचे रंग खुलले, गंध दरवळला म्हणजे लोक ती खुडून नेतात. कळीचे फुलणे म्हणजे मरणे. जे फुलते ते सुकते, गळते. कळी असणे म्हणजे अमर असणे. फुलणे म्हणजे नष्ट होणे. बाबा, मला कळीच राहू दे. " ती म्हणाली.
 " तुला फुलवणारा भेटला म्हणजे एकदम फुलशील. आपण कळीच राहावे ह्याची तुला मग आठवणही राहाणार नाही. तुझे रंग पसरतील, तुझा गंध घमघमाट करील. " तो म्हणाला.
 त्या दिवशी रात्री ढब्बूसाहेब जरा बाहेर गेले होते. कळी एकटीच घरी होतो. फाशी जाणारा एक मनुष्य तुरुंगात आहे ही गोष्ट तिला कळली होती. - फाशी जाणा-याला ती पाहू इच्छित होती. मरणाऱ्याजवळ दोन गोड शब्द बोलावे असे तिच्या मनात आले. त्याला दोन फुले नेऊन द्यावी असे तिला वाटले. ती उठली. दोन सुंदर फुले घेऊन निघाली. तिला कोण अडवणार ? तुरुंगाच्या अधिकाऱ्याची ती मुलगो, एकुलती एक लाडकी मुलगी.
 शिपायाबरोबर त्या फाशीकोट्याजवळ ती आली. आतील कैदी आनंदी होता.
 " ह्यांची खोली उघडा जरा. " कळी शिपायाला म्हणाली.
 " साहेब रागावतील. " तो म्हणाला.

फुलाला फाशीची शिक्षा १९