पान:फुलाचा प्रयोग.djvu/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 फुलाचा खटला सुरू झाला. न्यायमंदिरासमोर तुफान गर्दी झाली होती. “ देशद्रोह्याला फाशीची शिक्षा द्या !" अशा आरोळ्या लोक मारीत होते. स्वतः न्यायाधीश थरथरत होता. फाशीची शिक्षा तो न देता, तर लोक त्याच्याही जिवावर उठले असते. तो फुलाला सौम्य शिक्षा देता तर लोक रुद्रावतार धारण करते. न्यायाधीशाने शेवटी फाशीची शिक्षा फर्माविली. फुला शांत होता. लोकांनी टाळ्या पिटल्या.
 संगिनीच्या पाहायात फुलाला तुरुंगात नेण्यात आले. फाशी- कोठ्यात त्याला ठेवण्यात आले. तेथे निजण्यासाठी पेंढा होता. पाणी पिण्याला मडके होते. फुला शांतपणे त्या पेंढ्यावर पडला व झोपी गेला. जवळ सर्प आला तरी फुले भीत नाहीत. जवळ मरण आले तरी फुला शांत होता.
 फाशीची तारीख प्रसिद्ध झाली. उद्याचा तो दिवस. फुले फुलवणाऱ्या दिलदार फुलाचे प्राण उद्या जाणार होते. सृष्टीतील सारी फुले दुःखी दिसत होती. आत्याबाई बगीच्यात होती. परंतु सारी कुठे सुकली असे तिला वाटले.
 " का रे फुलांनो ? माना का खाली घालता ? फुलाच्या जिवाला का धोका आहे ? परंतु देव सारे बरे करील असे नाही का तो म्हणाला ? " असे ती म्हातारी फुलांना म्हणत होती.
 फुलाच्या खोलीच्या खिडकीसमोर वधस्तंभ उभारण्यात येत होता. ज्या खांबावर फाशी देणार तो खांब उभारण्यात येत होता. सुताराची ठोकाठोक ऐकू येत होती. त्या खांबाकडे फुला शांतपणे बघत होता. फुलाला समोर सारखे मरण दिसावे म्हणून दुष्टांचा तो प्रयत्न होता. परंतु पवित्र आत्म्याला मरणाची का भीती असते ?
 त्या तुरुंगाच्या अधिकान्याचे नाव ढब्बूसाहेब असे होते. त्याचा स्वभाव तामसी होता. त्याच्या शरीराचा तोल जसा त्याला सांभाळता येत नसे, त्याप्रमाणे मनाचाही तोल त्याला सांभाळता येत नसे. मोठी करडी असे त्याची शिस्त. कैद्यांकडे तो नेहमी साशंकतेने बघत असे. कैद्यांशी गोड बोलणे म्हणजे गुन्हा असे त्याचे मत होते.
 ढब्बू साहेबांना एक मुलगी होती, त्या मुलीचे नाव कळो. कळीची आई लहानपणीच वारली. आईवेगळ्या मुलीवर पित्याचे फार प्रेम. ढब्बूसाहेब

१८ * फुलाचा प्रयोग