बावळटाप्रमाणे ! अशा बतावणीने वाचणार नाहीस. ऊठ." तो मुख्य म्हणाला.
“ कोण देशद्रोही प्रधान ? " फुलाने प्रश्न केला.
"ज्यांच्यावर विश्वास टाकून राजा प्रवासास गेला ते. ते प्रधानही दुनियेतून नष्ट झाले. जनतेने न्याय दिला. आता त्या प्रधानांच्या साथी- दारांची वेळ आली आहे. तू फुले फुलवणारा असलास तरी काटा आहेस. काटे नष्ट केले पाहिजेत, नाही तर केव्हा बोचतील ह्याचा नेम नाही. ऊठ, ते कागद आधी दे. " फुलाचा हात ओढून तो मुख्य म्हणाला.
"कागदपत्र ?"
"हो. कागदपत्र."
"माझ्याजवळ कसले आहेत कागदपत्र ? माझ्या घरात फुलांची पुस्तके आहेत. फुलांची मासिके आहेत. तपासा सारे घर. फुलांचे राजकारण मला माहीत. दुसरे राजकारण मला माहीत नाही."
"खाली चल."सारे उघडून दाखव."
सारी मंडळी खाली गेली. फुलाने त्यांच्यासमोर किल्ल्या टाकल्या. शिपाई सारे धुंडाळू लागले. टेबलाचे खण तपासू लागले. टेबलाच्या खणांत निरनिराळ्या प्रकारची बिले होती. परंतु एक खण जोराने ओढला गेला. तो सारा बाहेर आला. त्या खणात पुढे बियांच्या पुड्या होत्या. परंतु पाठीमागे एक पुडके होते. कागदपत्रांचे पुडके !
"हे बघ कागदपत्र ! पुढे बियांच्या पुड्या ठेवून पाठीमागे दडवून ठेवले होतेस. परंतु सत्य बाहेर येते. पकडा ह्या हरामखोराला बांधा मुसक्या बांधा घोड्यावर व घेऊन चला."
तो प्रमुख गर्जला.
"हे कागद मी विसरूनच गेलो होतो. त्या माझ्या मित्रांनी हे दिले होते. हे कागद जाळून टाक म्हणून त्यांनी सांगितले होते. परंतु मी विसरलो. फुलांच्या नादात राहिलो. " फुला म्हणाला,
" आपल्याच तोंडाने सांगतो आहे सारं. मूर्ख आहे बेटा बघता काय, बांधा त्याला. " तो शिपायांना म्हणाला.
"जरा थांबा. मी वरून येतो. मग पकडा. माझे मित्र दुनियेतून गेले असतील तर मी तरी कशाला जगू ? " फुला म्हणाला.
१६ फुलाचा प्रयोग