पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. - . . आमचा धर्म वैदिक आहे. वेदामध्ये जे प्रत्यक्षतेने किंवा अप्रत्यक्षतेने सांगितले नाही, ते कोठेहि नाही अशी आमची सनातन समजत आहे. आमच्या धर्माचा, आमच्या प्राचीन शास्त्रांचा व आमच्या तत्त्वज्ञानाचा आम्हांस कौतुकास्पद अभिमान आहे. हा अभिमान लेखांत व भाषणांत वेळोवेळी प्रकट होत असतो, ही खन्या आनंदाची गोष्ट आहे. पण वेळेच्या अभावामुळे, औत्सुक्याच्या मंदगतित्वामुळे आणि श्रद्धातिरेकामुळे आमच्या प्राचीन विद्यांचे स्वरूप काय, त्या त्या विद्यांनी कोणते त्रिकालाबाधित सिद्धांत प्रकट केले आहेत, आपण ब्रह्मयज्ञांत ज्या ऋषींस व आचार्यास तृप्त करण्यासाठी उदकदान करितो, त्या ऋषींची व आचायांची योग्यता मोठी व अभिमानास्पद कां, वेदांत कोणते विषय अंतर्भूत झाले आहेत, वेदांगें म्हणजे काय, व ती कोणती, ब्राह्मणे म्हणजे काय, उपनिषदांचे स्वरूप कसे असते, दर्शन कशाला म्हणतात, धर्मशास्त्रांत काय सांगितले आहे, पुराणे कोणती कामगिरी करितात, इत्यादि हजारो मनोहारी व मनःसंस्कारी प्रश्नांची उत्तरे देण्याला आधुनिक हिंदुधर्माभिमान्यांपैकी पुष्कळांस सामर्थ्य नसते, असें म्ह्टल्यास सत्यभ्रष्टतेचा दोष लागेलसे मला वाटत