पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करता, केवळ सत्ता भोगून सुखेनैव आपला कालावधी आरामात पाडू शकतात. कारण ते व्यक्तिश: कोणत्याच बाबीला जबाबदार नसतात. यशाचं, चांगल्या कामाचं श्रेय त्यांना जरूर घेता येतं, मात्र अपयश इतर खातेप्रमुखांवर ढकलून मोकळं होण्याची पळवाटही त्यांना उपलब्ध असते.

 ‘पण सर्व खात्याचे समन्वयक असणं ही कलेक्टरांची फार मोठी ताकदही असते. कल्पक व उत्साही प्रशासक असणारा कलेक्टर त्याचा जिल्ह्याच्या कामासाठी वापर करू शकतो.

 ‘राजे सरांचं तुम्ही उदाहरण दिलंत. मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ही जिल्ह्याच्या प्रतिष्ठेची बाब समजून त्यांनी सारी शासनयंत्रणा तिच्या आयोजनासाठी राबवली व एक उत्तम स्पर्धा आयोजित केली. असं प्रत्येक क्षेत्रात कलेक्टरांना करता येतं.

 ‘प्रधान हे या दोन पेक्षा भिन्न अशा तिस-या प्रकारच्या प्रशासकाच्या वर्गात मोडतात. ही माणसे आत्मकेंद्रित असतातच, पण प्राप्त अधिकारामुळे इगोइस्टही असतात आणि ‘अहं ब्रह्मास्मि' या अभिमानाने ते स्वत:ला जिल्ह्याचे अनभिषिक्त राजे समजतात आणि केवळ अहंकारापोटी इतरांचं चांगुलपण सहन होत नाही. त्यांना विचारलं नाही म्हणून क्रीडास्पर्धेत अडथळे आणणं ही त्याचीच परिणती होती. दुर्दैवाची बाब एवढीच आहे की, अशा एक्सेंट्रीक व इगोईस्ट कलेक्टरांना, त्यांच्या लहरी वागण्याला आणि 'हम करेसो कायदा' वृत्तीला प्रचलित प्रशासन प्रणालीत वेसण घालता येत नाही, हे दुर्दैव म्हटलं पाहिजे!'

८८ । प्रशासननामा