पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रिय सर



 प्रिय सर,

 पु. ल. देशपांडे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने भारावून गेलेल्या अवस्थेत म्हटलं होतं की, 'मी विशाखा नक्षत्रावर जन्मलो आहे.' तसंच मला म्हणावंसं वाटतं की मी 'राजा' नक्षत्रावर जन्माला आलो. तुमच्या हाताखाली प्रोबेशन अधिकारी म्हणून आलो आणि खऱ्या अर्थाने द्विज झालो. ट्वाईस बॉर्न. गुरू शिक्षण देतो, तेव्हापासून विद्यार्थ्याचा नवा जन्म सुरू होतो. माझ्यातला जो प्रशासक आहे, त्याचा जन्म तुमच्या सहवासात आल्यापासून झाला आहे यात शंकाच नाही.

 बँक सोडून महसूल खात्यात अधिकारी म्हणून थेट आपल्या जिल्ह्यात प्रोबेशनसाठी आलो. कलेक्टर कचेरीतला पहिला दिवस आजही स्मरणात आहे. तो दुसरा शनिवार होता. शासकीय सुटीचा दिवस. बँकेत काम करणारा मी, सुटीची कल्पना मला नव्हती. एका लॉजवर सामान टाकून, फ्रेश होऊन दहा वाजता ऑफीसला गेलो तर तिथं सारा शुकशुकाट. एक शिपाई, कलेक्टरांचा स्टेनो. चिटणीस नामक एका अधिकाऱ्यानं माझं स्वागत केलं. 'सर, सकाळी बस स्टॅडवर कलेक्टर साहेबांच्या सूचनेप्रमाणे जीप पाठवली होती. पण आपणास आम्हाला ट्रेसआऊट करता आलं नाही. तुम्ही कुठं उतरलात? विश्रामगृहात आपल्या नावानं सूट रिझर्व करून ठेवला आहे आम्ही.' मी आ वासून त्याच्याकडे पहात राहिलो. सर, मी हे विसरून गेलो होतो की, आज रुजू होत असल्याबद्दलची मी तुमच्या नावानं तार केली होती. तुम्ही किती आत्मीयतेने माझी व्यवस्था केली होती! सुट्टी असूनही तुम्ही कार्यालयात काम असल्यामुळे आला होता. माझी तुमची भेट झाली आणि का कोण जाणे, मला एकदम निश्चिंत वाटलं. तुमच्या व्यक्तिमत्त्वात असं काही रसायन आहे की, समोरचा माणूस आश्वस्त होतो. समोरच्याला ‘ॲट इझ' करीत संपर्क साधण्याची तुमची अनोखी शैली नंतर अधिक तपशिलाने जाणवत गेली. पण पहिल्या भेटीत एवढा मला दिलासा

प्रशासननामा । ८९