पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘माफीचा प्रश्न येतोच कुठे? उलट आपल्यासारखे जागरूक समाजहितैषी नागरिक आपणहून शासनाला मदत करू इच्छितात-हे आमच्यासाठी चांगलेच आहे. चंद्रकांत मनापासून म्हणाला, 'मी तुमच्या बातमीवर पूर्ण विश्वास ठेवून योग्य ती कार्यवाही करीन!'

 त्या वृद्धानं सांगितलेली बातमी ऐकताना चंद्रकांतला जाणवलं की, ती जर खरी असेल व आपल्याला भक्कम पुरावा सापडला तर रॉकेल रॅकेटमधील 'बडी मछली' पकडता येईल. पहिले बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी का करायची हे पटवून देताना जे सूत्र सांगितले ते तर सर्वकालीन सत्य आहे. 'मुळावर घाव घातला की फांद्या आपोआपच खाली पडतात.' बाजीरावांचे हे प्रसिद्ध वाक्य रॉकेल टंचाई प्रकरणातही लागू पडणार होतं. शहराचा काळा बाजार करणारा केरोसीन किंग' जर पकडला गेला तर कृत्रिम टंचाईवर परिणामकारक मात करता येणार होती. शहरातील केरोसीन किंग बद्रीप्रसादनं प्रत्यक्षात वडगाव भागासाठी सब एजंट मानेंना रॉकेलचे टँकर न देता ते बाहेरगावी काळ्याबाजारात वळते केले होते, अशी बातमी त्या अनाम वृद्धानं देत पुढे म्हणलं, ‘सर-आपण उद्याच मानेच्या ऑफिसवर धाड टाकली व गावात चौकशी केली तर कळेल की, मागील आठ दिवसात जेमतेम शे-पाचशे लीटर रॉकेल जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी वाटप केलं असेल. एवढेच!'

 चंद्रकांतनं आपल्या पुरवठा निरीक्षकासह दुसऱ्या दिवशी सकाळीच वडगावला जाऊन मानेच्या ऑफिसातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. पंधरा दिवसापूर्वी दोन टँकर्सनं चोवीस हजार लीटर रॉकेल बद्रीप्रसाद कडून त्याला प्राप्त झाल्याची व ती पुढील तीन दिवसात वडगाव सर्कलमधील चौतीस स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांना वाटप केल्याच्या नोंदी होत्या. रेकॉर्ड एकदम आलबेलं होतं; पण जेव्हा त्या ३४ दुकानदार व एजंटपैकी आठ-दहा जणांच्या गावी जाऊन तपासणी केली तेव्हा गावकऱ्यांनी गावात रॉकेल आलेच नाही असा जबाब लिहून दिला. तेव्हा किरकोळ विक्रेते व स्वस्त धान्य दुकानदारांनी कबूल केलं की, त्यांनी रॉकेल गावी आणलेच नाही आणि आपणावर प्रकरण शेकू नये म्हणून त्यांनी आपण रॉकेल विकत घेतलेच नाही असा जबाब दिला.

 तूर्त चंद्रकांतनं त्यांचा खुलासा मान्य करून यापुढे असे प्रकार करणार नसल्याची हमी घेऊन व त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड करून सोडून दिले. कारण त्यांचं लक्ष होतं माने व बद्रीप्रसाद.

 पूर्ण चौकशीअंती चंद्रकांतनं हे सिद्ध केलं की, मानेनं बद्रीप्रसादकडून विकत घेतलेलं रॉकेल वाटप न करता काळ्या बाजारात वळतं केलं. कलेक्टरांच्या

प्रशासननामा । ७७