पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सब घोडे बारा टक्के



 ‘क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर आज श्री. जाधव यांच्या बदलीने आमच्या साक्षरता मिशनचा आघाडीचा खंदा फलंदाज बाद झाला आहे. यापूर्वीच आमचे कॅप्टनही परतले आहेत. आता मला विजयासाठी उपकप्तान म्हणून ऑलराऊंडरप्रमाणे सर्व जबाबदारी पार पाडायची आहे. त्यासाठी या मौलाना हायस्कूलचे अध्यक्ष व आमच्या साक्षरता अभियान समितीच्या सदस्यांसारखे तळमळीचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात जिल्हा प्रशासनाला हवे आहेत. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे मला माझी विकेट, सामना संपेपर्यंत आणि विजयी चौकार लगावेपर्यंत सांभाळायची आहे.

 प्रसंग होता तहसीलदार जाधव यांना निरोप देण्याचा. ते उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जात होते. समारंभ मौलाना हायस्कूलचे अध्यक्ष अब्दुल रशिद यांनी आयोजित केला होता. साक्षरता अभियानात काम करणाऱ्या शाळा व पूर्णवेळ सेवाभावी कार्यकर्ते यांच्या वतीने जाधव यांच्या साक्षरता अभियान कार्यातील योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होता.

 या निरोप समारंभाचा अध्यक्ष होता चंद्रकांत, - उपजिल्हाधिकारी व साक्षरता अभियान मिशनचा प्रमुख समन्वयक. तो अध्यक्षीय भाषण करताना वरीलप्रमाणे बोलला होता. त्यावेळी भारत-पाक एक दिवसीय क्रिकेट सामन्याची लढत चालू होती, म्हणून त्याचा संदर्भ चपखल होता. पूर्वी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या खानदेशातील शैक्षणिक संस्थेच्या कॉलेजमध्ये जाधव प्राध्यापक होता. तहसीलदार झाल्यावरही तो मनापासून साक्षरता अभियानात काम करीत होता. त्याची जिद्द, तळमळ व प्रभावी वक्तृत्व वाखाणण्याजोगे होते. त्याची पदोन्नती ही समाधानाची बाब होती, पण चंद्रकांतला साक्षरता अभियानाची चिंता लागून राहिली होती. ती त्याच्या भाषणातून व्यक्त होत होती.

 पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात संपूर्ण साक्षरता मिशन स्थापन झाले होते. काही प्रभावी संचालकांमुळे त्याने चांगलेच मूळ धरले होते. या जिल्ह्यात

प्रशासननामा । ३५