पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चंद्रकांत सुन्न होऊन कितीतरी वेळ आपल्या दालनात बसून होता. आमदाराला साधी कायद्याची जाणीव करून दिलेली रुचली नव्हती. त्यांना येनकेन प्रकारे गुत्तेदाराला जेलमध्ये एक रात्रही राहू देणे मंजूर नव्हते.

 दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आर.डी.सी. परीक्षा प्रमुख. त्यामुळे सुट्टी असूनही कलेक्टर कचेरी चालू होती. सकाळचा पेपर संपला होता. दुपारच्या पेपरसाठी प्रश्नपत्रिका विविध केंद्रांना पाठविण्याचे काम चालू होते. त्याचवेळी शहर कोतवालीचे पोलीस इन्स्पेक्टर चंद्रकांतच्या दालनात आले व सॅल्यूट मारीत अदबीनं म्हणाले,

 ‘सर, आमदार मोर्चा घेऊन आले आहेत. त्यांचे शिष्टमंडळ आत पाठवू?'

 चंद्रकांतला हसू आलं. कारण तो मोर्चा त्याच्या बदलीसाठी व तहसीलदाराच्या निलंबनाच्या मागणीसाठी होता. कलेक्टर रजेवर असल्यामुळे त्यालाच प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून मोर्चाचे निवेदन घेऊन येणाच्या शिष्टमंडळाला भेटावं लागत होतं.

 'ठीक आहे, त्यांना हॉलमध्ये घेऊन या व बसवा. मी परीक्षेचे पेपर्स पाठवून झाले की निरोप देतो. तेव्हा त्यांना घेऊन या.'

 काही क्षणातच पुन्हा तो पोलीस इन्स्पेक्टर आला.

 ‘सर, आमदार आत्ताच भेटायचं म्हणतात. दुपारचे दोन वाजले. मोर्चेकरी भुकेने कंटाळले आहेत. तुमच्या भेटीनंतर मोर्चा संपणार आहे.'

 हीच वेळ होती. आमदारांना एक जाणीव करून देण्याची की, कायद्यापुढे सर्वजण समान असतात. तो कोणालाही मोडता येत नाही.

 चंद्रकांत क्षणभर विचार करून म्हणाले, 'ओ. नो., महत्त्वाची एम.पी. एस.सी. ची परीक्षा चालू आहे. दुपारचा पेपर तीनला आहे. मला सर्व केंद्रावर पेपर्स अडीचपर्यंत पोचवायचे आहेत. त्यात उशीर क्षम्य नसतो. तेव्हा आमदारांना सांगा, भेटीसाठी किमान पाऊण तास लागेल.'

 आमदारांना हा निरोप कालच्यापेक्षाही मोठा अपमानकारक वाटला. त्या तिरमिरीत त्यांनी मोर्च्याचे निवेदन पोलीस इन्स्पेक्टरला दिले व म्हटले,

 'लई माज चढलाय त्या आर.डी.सी.ला. हे तुम्हीच त्याला द्या. मी आता माझ्या संपर्क कार्यालयात जातो व महसूलमंत्र्यांना, आयुक्तांना फोन लावतो. आता त्याची बदली अटळ आहे, असा माझा निरोप द्या.'

 आणि त्याप्रमाणे चक्रे फिरू लागली. परीक्षेचे पेपर्स पाठवून तो चहा घेत होता, तेवढ्यात त्याला विभागीय आयुक्तांचा फोन आला. 'अरे चंद्रकांत, काय भानगड आहे? तुझ्यावर तो आमदार का एवढा चिडला आहे? तुझी

प्रशासननामा । २३