पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होताच भाऊरावला माहिती व्हायची किंवा इतर तलाठी व गिरदावार द्यायचे. त्यांच्या मंजुरीचे एकमुठी वा वट्ट काम तो हाती घ्यायचा. पैशाची देवघेव व त्याची रक्कम आणि तपशील ठरवायचा. तहसीलदार व प्रांतसाहेबांना एकत्रितपणे त्यांच्या वाटा बिनबोभाट पोचता करायचा आणि नोंदी करून द्यायचा. भित्र्या व स्वत:ची इमेज जपू पाहणाच्या वरच्या अधिकाऱ्यांना काहीही न करता बिनबोभाट, घरपोच पैसे हप्त्याच्या स्वरूपात मिळायचे, अशी मोडस ऑपरेंडी होती भाऊरावाची. बापूसाहेब चंद्रकांतला भाऊरावबाबतची, त्यांना पत्रकार या नात्यानं ज्ञात असलेली माहीती देत होते.

 भाऊराव तलाठ्याची पूर्ण जिल्ह्यात एवढी कीर्ती होती की, सारे पुढारी, तालुक्याचे सातत्याने निवडून येणारे आमदार, काही अपवाद वगळले तर त्याची पाठराखण करायचे. केवळ शामराव सावंतचे व त्याचे का फाटले हे मात्र गूढ होतं. काहीतरी बाईची भानगड आहे अशी वदंता होती!

 भाऊराव हा टिपिकल तलाठी होता. त्यामुळे कोणत्याही शासकीय अनुदान कर्ज योजनेतल्या खाचाखोचा त्याच्या पटकन लक्षात यायच्या. त्याचा कसा फायदा घ्यावा हेही त्याला नेमकेपणानं उमगायचं! प्रस्तुतचं, पूर आला नसताना घरं पडलेली दाखवून खोटा पंचनामा-तोही गावकऱ्यांना कळू न देता करणे व अनुदानाची रक्कम लाटणे हे त्याच्या महसुली कसबाचे उत्तम उदाहरण होतं!

 “बापू, शेतकऱ्यांच्या गळ्याला असलेली तलाठ्यांची मगरमिठी हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. केवळ तलाठीच नव्हे, तर तहसीलदार व उपजिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी स्तरापर्यंतचे विविध खात्याचे कर्मचारी व अधिकारी-मग ते ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी असतील किंवा गट सचिव ते डेप्युटी रजिस्ट्रार (सहकारी संस्था) असतील, शेती, बांधकाम, वीज खात्याची माणसं असतील. सारेजण शेतकरी व ग्रामीण माणसाला आपआपल्या परीनं नागवत असतात. तलाठ्यावर नाराजी सर्वात जास्त दिसते. कारण जास्तीत जास्त शेतकरी व ग्रामीण लोकांचा त्याच्याशी सर्वाधिक संबंध येतो. पुन्हा जमिनीवर ग्रामीण माणसाचं लोकविलक्षण प्रेम व माया असते. त्यामुळे तिच्याबाबत ढवळाढवळ करणारा तलाठी शेतकऱ्यांना सर्वात जास्त चीड आणतो एवढंच! बाकी कमी अधिक प्रमाणात सर्वच शासनयंत्रणा अशीच आहे. उडदामाजी काळे-गोरे काय निवडावे अशी व्यवस्था आहे."

 “तुमचं ॲनॅलिसिस बरोबर आहे. पण त्याची दुसरी बाजू - वरचे अधिकारी त्यांचे काय?" बापूसाहेबांनी विचारलं.

 "मी त्यावरही येत होतोच बापू."

प्रशासननामा । १३७