पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पन्नास तलाठ्यांचा अनभिषिक्त नेता होता. यापूर्वीचे तहसीलदार हे मराठवाड्यात प्रशासकीय कौशल्याबद्दल दरारा असलेले होते. त्यांनीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आपली तीन वर्षे काढली होती. या बदल्यात भाऊरावानं त्यांच्या वाट्याला जायचं नाही व वरिष्ठांपर्यंत जातील एवढ्या मोठ्या भानगडी करायच्या नाहीत आणि तहसीलदार म्हणून त्यांनी भाऊरावच्या इतर गोष्टींकडे कानाडोळा करायचा. असा त्यांच्यात अलिखित करार झाला होता.

 त्यांच्यानंतर आलेल्या तहसीलदारांना कलेक्टर मठ्ठ काळा बैल म्हणत असत. त्यात काही खोटं नव्हतं. म्हणून भाऊरावानं मागील तीन वर्षातला कमाईचा व भानगडींचा बॅकलॉग भरून काढायचा धूमधडाका लावला होता.

 पण पापाचा घडा केव्हा ना केव्हा भरतोच. तसंच झालं भाऊरावांचं. त्याला खमका पुढारी शामराव सावंतच्या रूपानं भेटला. सावंतचं प्रचंड उपद्रवी मूल्य लक्षात घेऊन त्याच्या जिल्हा परिषद मतदार संघातले सारे कर्मचारी व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ज्युनिअर इंजिनिअर्स व शेतकी अधिकारी चूपचाप हप्ते देत असत. त्याच्या विभागात पाच वर्षे झाली म्हणून भाऊरावाची त्याच्या संमतीनं बदली झाली. त्याला वाटलं होतं, सावंत आपल्या वाटेला जाणार नाही. पण त्याच्या लेखी भाऊराव हा इतर तलाठ्यांप्रमाणे एक तलाठी होता. त्यानं ठरावीक हप्ता द्यायलाच हवा होता!

 भाऊराव स्वतः ब्लॅकमेलर म्हणून मशहूर होताच. तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना हवं नको ते पुरवून त्यांची मर्जी राखायचा, पण त्याच काळात त्यांच्या गैरकृत्यांचे पुरावेही स्वत:जवळ राखून ठेवायचा. मग त्या जोरावर आपली दादागिरी, सरंजामशाही चालवायचा. सावंतनं हप्ता मागणे हा त्याला अपमान वाटला. त्यानं सावंतला नकार दिला. तेव्हा तोही अपमानानं व हप्ता न मिळाल्यामुळे चिडून भाऊरावाच्या मागे लागला.

 त्याला संधीही लवकरच मिळाली. पावसाळ्यात नदीकाठच्या भाऊरावाच्या गावांमध्ये पूर येऊन घरे पडली, म्हणून भाऊरावाच्या अहवालाप्रमाणे तहसीलदारांनी घरदुरुस्तीसाठी बाधित घरमालकांना सुमारे तीन लक्ष रुपयांचे घरबांधणी अनुदान वाटले. सावंतनं हे प्रकरण उचलून धरलं. भाऊरावाच्या सातही गावात जाऊन घर न् घर पालथे घालून, गावात अनेक घरापर्यंत पूर आलाच नसताना आणि घरे पडली नसताना खोटे पंचनामे करून अनेकांना चुकीची मदत वाटली अशी तक्रार केली. तक्रारीसोबत प्रत्येक गावांतील नावानिशी व घरक्रमांकानिशी झालेल्या गैरप्रकाराचा तपशील जोडला होता. आणि सातही गावांतील ज्या घरांना पडल्याबद्दल अनुदान वाटप झाले होते, त्यांचे व्हिडीओ

प्रशासननामा । १३३