पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्षे चालला आणि त्यातून निष्पन्न काय झालं? काही नाही. त्याला केवळ वॉर्निग देण्यात आली. पण पाच वर्षात पदोन्नती मिळून उपजिल्हाधिकारी, मग अप्पर जिल्हाधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न भंग झालं. त्याचे बॅचमेट अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून, येत्या एक दोन वर्षात आय.ए.एस. होण्याची उमेद बाळगून आहेत. किशोर आता कुठे उपजिल्हाधिकारी झाला आहे व सेवानिवृत्तीपर्यंत येईपर्यंत. अप्पर जिल्हाधिकारी होईल फार तर... अन्यथा त्याला त्याची आशा नाही.

 थोड्याफार फरकाने तादलपूरकरांची कहाणी तशीच आहे. ते थेट उपजिल्हाधिकारी झालेले. पण रोजगार हमी योजनेचे तेव्हा ते उपजिल्हाधिकारी होते. वनविभागाच्या मागणीनुसार रो.ह.यो. अंतर्गत वनीकरणाच्या कामासाठी कलेक्टरांच्या मंजुरीने वनविभागाने गरजेपेक्षा जास्त रक्कम मागून चक्क भ्रष्टाचार केला. वनखात्यास रक्कम दिली गेली. अर्थातच भ्रष्टाचार झाला तो त्या वनखात्याच्या पातळीवर. मात्रा शिक्षा झाली ती तादलपूरकरांना! खरंतर, रक्कम देण्याचे अधिकार कलेक्टरांचे. तादलपूरकरांनी मागणीप्रमाणे संचिका सादर केली होती. चूक असेल तर दोघांची म्हणायला हवी. पण चौकशी झाली ती फक्त तादलपूरकरांची! ती दीर्घकाळ रेंगाळली व चौकशी चालू आहे म्हणून पदोन्नती थांबली. त्यांचे बॅचमेट आय.ए.एस. होऊन सेवानिवृत्त झाले. ते मात्र सेवानिवृत्तीच्या आधी सहा महिने चौकशीतून मुक्त झाले म्हणून जेमतेम अप्पर जिल्हाधिकारी तरी होऊ शकले.

 या दोन्ही प्रकरणात जलद गतीने चौकशी होणे अपेक्षित होते. कारण दोघेही राजपत्रित अधिकारी. पण त्यांच्या फटकून वागण्याच्या स्वभावामुळे असेल कदाचित, त्यांचे प्रकरण कुजवण्यात आले. त्यासाठी अकारण पत्रव्यवहार व कालहरणाचे तंत्र वापरण्यात आले आणि दोघांची करिअर बरबाद झाली.

 “मला कागदी घोडे नाचविण्याच्या आमच्या एकूणच प्रशासनाच्या वृत्तीची मनस्वी चीड आहे!" चंद्रकांत आत्मपरीक्षणाच्या मूडमध्ये शिरला होता. “पण दुर्दैवाने अनेकवेळा मलाही तेच करावं लागलं आहे! कारण प्रत्येकवेळी स्वत:ला असं पणाला लावता येत नाही आणि आपले अधिकार सीमित असतात ही जाणीव ॲडमिनिस्ट्रेशनचा सेफ गेम खेळला पाहिजे यासाठी मजबूर करते. कधीकधी प्रशासनात्मक अवाढव्य अशा आकाशपाळण्याचे आपण फार छोटे चक्र आहोत व त्याची गती आपण ठरवू शकत नाही ही जाणीव निर्णयक्षमतेवर परिणाम करते. मग कागदी घोडे नाचवणे सुरू होतं. आम्ही कागदाचे स्वामी। कागदावर राज्य करतो। कागदे सांभाळीत जगतो। सुखैनेव|' या तुकबंदीप्रमाणे

११६ । प्रशासननामा