पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एवढा, की रात्री आपणहून कार्यालयात थांबत होता. कारण पावसाला खंड नव्हता.

 वयोवृद्ध असलेले निवासी उपजिल्हाधिकारी अतिश्रमानं आजारी पडले होते. त्यामुळे चंद्रकातंचं काम वाढलं होतं. आता सायंकाळी सात वाजता कलेक्टरांनी दहा हजार अन्नाची पाकिटे रात्रीतून तयार करून सकाळी सात वाजता विमानतळावर पोचती करायची अवघड कामगिरी सोपविली होती.

 चंद्रकातनं शांतपणे मनोमन काम कसं पार पाडायचं याचा दहा मिनिटं विचार केला. तहसील कार्यालय हे कलेक्टर ऑफिसच्या परिसरातच होते. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोलावून कामाची कल्पना देत म्हणाले, “आता आपल्यापैकी कुणालाही घरी जाता येणार नाही. महसूल खात्याला जी नानाविध कामे करावी लागतात त्यात आज एका नव्या कामाची भर पडणार आहे.खानसामा, महाराजाची. आपणा सर्वांनी मिळून हा रोल अदा करायचा आहे."

 आणि विद्युतवेगानं निर्णय घेत त्यानं कामं भराभर वाटून दिली. तलाठी व जुन्या शहरामध्ये राहणा-या पेशकरांना (अव्वल कारकून) जीप देऊन मिळतील तेवढे स्वयंपाक करणारे आचारी- महाराज घेऊन येण्यासाठी पाठवलं. दुसऱ्या ग्रुपला लाकडे, मोठमोठी चुल्हाणं व भांडी आणण्याची सूचना दिली. तहसीलदार व महिला कर्मचा-यांशी मसलत करून, आचारी येताच कोणते अन्नपदार्थ तयार करायचे हे निश्चित केले. पुरी-भाजी, व्हेज बिर्याणी सदृश खमंग भात अर्थात चित्रान्न हे पदार्थ लवकर होतील असं वाटल्यामुळे तो मेनू ठरविला.

 वेळ वेगानं निघून जात होता. वरीलप्रमाणे कामाला सुरुवात झाली तेव्हा नऊ वाजले होते. सहा-सात चुल्हाणे पेटली होती. आचारी पुरी-भाजी करत होते व त्यांना तहसीलचे कर्मचारी मदत करत होते.

 पण तयार होणाच्या पदार्थांची गती पाहता दहा हजार पाकिटे तयार होणे शक्य नाही हे काही वेळाने लक्षात आले. तेव्हा चंद्रकांतनं तिथं सहज काय चाललंय हे पाहण्यासाठी आलेल्या नगराध्यक्ष लालाणींना मदतीची विनंती केली आणि शहरातील सर्व बेकऱ्यांमधून चार गाड्या पाठवून ब्रेड, बिस्किटे, टोस्ट व खारी जमा करावीत असं ठरवलं. पण बहुतेक सर्व बेकऱ्या बंद होत्या. तेव्हा बेकरीवाल्यांच्या घरी जायचं व त्यांना उठवून, त्यांच्या दुकानात जाऊन त्यांच्याजवळील सर्व पदार्थ विकत घ्यायचे, असा द्राविडी प्राणायम सुरू झाला.

 चंद्रकांतने आणखी एक शक्कल लढवली. मुरमुरे, गूळ, शेंगदाणे, फुटाणे, बत्तासे, लाह्या एकत्र तयार करून त्याची किलो किलोची पाकिटे तयार करायची सूचना दिली. त्यासाठी पुन्हा या वस्तूंच्या ठोक व्यापाऱ्यांना घरून उठवून

१०४ । प्रशासननामा