पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आपत्ती व्यवस्थापन - नेतृत्वाची कसोटी



 चंद्रकांतचा अवतार पाहण्यासारखा झाला होता. तीन दिवसांची वाढलेली दाढी, चुरगळलेले कपडे, दोन रात्री- तीन दिवस अहोरात्र कलेक्टर कचेरीत थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवायचे काम असल्यामुळे घरी जाता आले नव्हते! आज मात्र सायंकाळी घरी जाऊन थोडी विश्रांती घेऊ, असे मनाशी ठरवून तो निघाला. तेवढ्यात कलेक्टर भावे साहेबांनी बोलावून सांगितले, “मी आताच सर्किट हाऊसवरून आलोय. तिथे केंद्रीय नियोजन मंत्र्यांनी बैठक घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याने वेढलेल्या गावांची ते उद्याच सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी करणार आहेत. त्यावेळी पुरानं वेढलेल्या गावांत अन्नाची पाकिटे टाकायची आहेत. ती तयार करायचे काम ती तुला देतोय. सुमारे दहा हजार अन्नाची पाकिटे करायची आहेत. आज रात्री तुझ्या दिमतीला तहसीलदार व त्यांचा पूर्ण कर्मचारी वर्ग देतो. गाड्या आहेतच; कॅशबॉक्समध्ये पैसा आहे. आय ॲम कॉन्फिडंट, यू कॅन डू इट!

 प्रोबेशनवर असणाऱ्या चंद्रकांतला नाही म्हणणे शक्यच नाही.

 गेले पाच दिवस सतत पाऊस पडत होता. पन्नास इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. गोदावरी व तिच्या उपनद्या दुथडी भरून वाहत होत्या. सीमेवरच्या आंध्र प्रदेशातील पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटरने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. शंभरेक गावे पाण्याने वेढली गेली होती. त्यांचा जगाशी संपर्क तुटला होता. तीन दिवसांपूर्वी कार्यालयात सकाळी आलेल्या चंद्रकांतला दर तासाला पूररेषेची पातळी तपासून त्याची माहिती मुंबईतील मंत्रालयाला आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाला कळवावी लागत होती. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे संदेश घेणे आणि ते कलेक्टरांना पोचते करून, त्यांचे आदेश पुन्हा तहसीलदारांना देणे ही कामे करायला एकटे निवासी उपजिल्हधिकारी पुरे पडत नव्हते. त्यांच्या मदतीला प्रशिक्षणार्थी चंद्रकांत दिला होता. तोही पुराची आपत्ती म्हणजे आव्हान समजून मनापासून काम करत होता.

प्रशासननामा । १०३