पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(कॅलिडिओस्कोप) आणायचो नि पहायचो. या साच्यात मनोरंजन, जिज्ञासा, कुतूहल असायचं तसं कल्पनेचं जग रुंदावणारं नवं क्षितिज त्यातून दिसायचं.

 ‘सुगंध' असाच बहुविध, बहुभावी कॅलिडिओस्कोप आहे. यात आठवणी, व्यक्तिलेख, समीक्षा, लघुनिबंध, कथा, आढावा सारं आहे. रसांच्या विविध अंगानं बोलायचं तर यात हास्य, करुणा, आश्चर्य सारं आहे. शैली कधी गंभीर तर कधी गमतीच्या अंगानं जात हास्यकल्लोळ उठवणारी! लेखकाकडे मुळात असलेली अनुभवांची अस्सलता - त्याचा गंध, रंग मौलिक! त्यामुळे ‘सुगंध'चं वाचन ही पंचपक्वान्नांची मेजवानी. ज्यांना कुणाला लेखनशैलीच्या नाना कळा अनुभवायच्या असतील त्यांना सुगंध एक वस्तुपाठ ठरावा. डॉ. माळींना त्याची प्रतवारी करता आली असती. पण त्यांचा उद्देशच मुळी आपले सारे वाण एकत्र पेश करण्याचा आहे. त्यामुळे आलेल्या वैविध्याने वाचकांचा रुचिपालट आपसूक घडून येतो व ‘सुगंध' हातासरशी केव्हा वाचून होते ते वाचकांच्या लक्षातही येत नाही. ही असते सारी अष्टपैलू, इंद्रधनुष्यी लेखनाची किमया. ती सा-यांनाच जमेल असे मात्र नाही.

 प्राचार्य डॉ. माळी यांनी कवी कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, समीक्षक डॉ. ल. रा. नसिराबादकर, प्रा. एन. डी. पाटील, प्राचार्य डी. डी. मगदूम, अभिनेता निळू फुले, कथाकार रणजित देसाई इ. मान्यवरांचे जीवन, कार्य, विचार, सामाजिक योगदान कधी लेखाच्या तर कधी समीक्षेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आपल्या आवडत्या कवी भेटीचं मनोज्ञ वर्णन ते ‘मनविहारी सकाळ' मध्ये करतात. ‘क्षण एक पुरे भेटीचा' मध्ये आपल्या प्रेरक अभिनेत्याचं - निळू फुलेंचं रसज्ञ वर्णन करतात. आपल्या ज्ञातीतला हा माणूस इतका मोठा असल्याचं समाधान नि औत्सुक्य याचं द्वंद्व, द्वैत रसभरित झालंय. कवी नारायण सुर्वे व कथाकार रणजित देसाई यांचा साहित्यिक धांडोळा अभ्यास, समीक्षा इ. अंगाने डॉ. माळी सादर करतात. त्यात लेखनाची अभ्यासकाची शिस्त व बैठक लक्षात येते. आपल्या गुरुजनांविषयीचा आदर ते ध्येयवादी अध्यापक', 'एक समर्पित जीवन', ‘कर्मवीरांचा खरा वारसदार' सारख्या लेखांतून व्यक्त करतात.

 व्यक्तिपर लेखनाची आत्मपर छटा त्यांच्या वाटेवर काटे वेचीत चाललो' सारख्या अपवाद लेखात दिसून येते. ते त्यांचं छोटेखानी आत्मकथनच! याच अंगानं पण जीवनातील वैविध्यपूर्ण अनुभवांचं कथन ते प्रमुख पाहुणा' (कथा), ‘सौ. माहेरून येते व जेव्हा मी डॉक्टर झालो या लेखांतून करतात. व्यक्तिपर लेखनात गंभीर लिहिणारा हा लेखक या

प्रशस्ती/५४