पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लेखातून विनोद, हास्य इ. च्या अंगाने समाजाचे अज्ञान, त्यातून आपल्या उच्च विद्याविभूषित होण्याची ऐशीतैशी मार्मिकपणे शब्दबद्ध करतात. लेखक जेव्हा स्वतःचं जीवन हा आपल्या टीका नि व्यंगाचा विषय बनवतो, ती त्याच्या प्रगल्भ प्रतिभेची खूण असते. ‘दिवस असेही होते लेखही आत्मपर लेखनात चपखल बसणारा. तो वाचताना प्र. के. अत्र्यांचे ‘मी कसा झालो' आठवल्याशिवाय राहात नाही. समाजवादी वाहनातील सहप्रवासी' लेख विनोदी शैलीचा नमुना म्हणून अवश्य वाचायला हवा.

 डॉ. माळी वृत्तपत्राची गरज, फर्माईश म्हणून आढावा घेणारे लेख लिहितात. भारतीय प्रजासत्ताकास चार दशक झाल्याच्या प्रीत्यर्थ ‘प्रजेने, प्रजेसाठी' शीर्षक लेख लिहून आपली सामाजिक निरीक्षण नोंदवतात. त्यातून त्यांची राजकीय जाणही स्पष्ट होते. ‘मायबोली मराठीची स्तुती आणि स्थितीतून ते शासन, समाजाच्या भाषा व्यवहाराचं वास्तव वेशीवर टांगतात आणि समजावतात की मराठी भाषेचा विकास व वापर वाढायचा तर ‘‘मातृभाषेच्या स्तुती ऐवजी स्थिती पाहून कृती हवी."

 अशा प्रकारे ‘सुगंध' हा विविध विषयांना स्पर्श करणारा लेखसंग्रह आहे. लेखक वेळोवेळी प्रसंगपरत्वे काही एक दृष्टी ठेवून लिहितो. पण ते जेव्हा संग्रह रूपाने एकत्रपणे वाचकास वाचण्यास मिळते तेव्हा लेखकाचे अनुभव, शैली, जीवनदृष्टी इत्यादींचे सम्यक दर्शन घडते. ‘सुगंध'मुळे ते झाले आहे. डॉ. माळी यांच्यातील लेखकात एकीकडे मार्क्सची समाजदृष्टी आहे तर दुसरीकडे चॅप्लीनचं व्यंगावर नेमकं बोट ठेवण्याचे कौशल्यही. ते एखादा गंभीर विषय अत्यंत पोक्त नि जबाबदारीने हाताळतात तितकाच एखादा साधा विषय सहज नि गमतीदारपणे. हे डॉ. माळींच्या लेखनाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य होय. त्यांना साहित्य, समाज, व्यक्ती, राजकारण अशा बहुविध क्षेत्राची चपखल जाण आहे. त्यांचे जीवन कृतज्ञतेच्या संस्कारांनी भारलेलं आढळतं. ते सामान्यात जसे रमतात तसे असामान्यातही. त्यांचं सारं जीवन व लेखन म्हणजे मागे टाकलेल्या आयुष्याचा मागोवा घेणं आहे. त्यात त्यांच्यातील चिकित्सक, टीकाकार सतत जागा असतो. स्तुती नि स्थिती यातला फरक नि अंतर ते ओळखून आहेत. म्हणून त्यांच्या एकंदर लेखनास साहित्य, संस्कृती, व्यक्तिवेध यांचा केवळ सुगंध नाही तर सुवर्णाची झळाळी पण आपलं लक्ष वेधून घेते. ‘सोने पे सुहागा' असं त्यांच्या या लेखनप्रपंचाचं वर्णन करावं लागेल.

 डॉ. जी. पी. माळींचं हे लेखन मराठी सारस्वतास अनुभव आणि अभिव्यक्ती अशा उभयांगानी समृद्धी देणारं आहे. त्यांच्या लेखन साधनेस

प्रशस्ती/५५