पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

समाजमूल्य येऊन जाते. हे पुस्तक वाचक जितक्या सहजपणे, निरपेक्षपणे म्हणजे पूर्वप्रभावमुक्त होऊन वाचेल तर त्याचा कायाकल्प घडल्याशिवाय राहणार नाही. हे असते या लेखनाचे योगदान. वाचकाला लेखकानुवर्ती बनवण्याचे सामर्थ्य या लेखनशैलीत आहे. तिरंग्याचा त्रिपल डोस' म्हणजे ध्येयासक्ती, देशभक्ती आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम. हे सारं पूर्वनियोजित कारण लेखक लेखनापूर्वी काही एक मानसिक मशागत करून लिहितो, हे। यातून स्पष्ट होते. घेतले पेन नि लिहिले असे घाईतले हे लेखन नाही. त्यामुळे ते पाट्या टाकणारे स्फुट राहात नाही.
 धर्म, दान, वाद, राजकारण, पर्यावरण, दुष्काळ, दहशतवाद, परंपरा, कामगार, आर्थिक नियोजन, आत्महत्या, कॉर्पोरेट जग, भाषा (उर्दू), न्याय, प्रसिद्धी, आदिवासी, आधुनिक शिक्षण, इतिहास, विवाह, व्यायाम, वटसावित्री, परीक्षा, भू-सुरुंग इतके अकल्पित विषय घेऊन लिहिलेली ही स्फुटे वाचत असताना वाचक नकळत समृद्ध होऊन जातो. तो अष्टपैलू बनतो. त्याच्या जाणिवा रुंदावतात आणि आकांक्षा उंचावतात. हे या लेखनाचे खरे यश होय. या स्फुटांची शीर्षके बोलकी, समर्पक आहेत. शिवाय ती काही ठिकाणी काव्यात्मक आहेत. ‘गा बाळांनो गा रामायण', ‘हिरवळ झाली वनवासी’, ‘रूप लावण्य अभ्यासिता न ये', 'ये परदा हटा दो', ‘अपने लिए जिए तो क्या जिए', ‘जानामि धर्मम् नच मे प्रवृत्तिः' ही शीर्षके वाचली किंवा लेखांमधील इंग्रजी अवतरणे पाहिली की लक्षात येते की लेखक बहुश्रुत जसा आहे, तसा बहुभाषीपण, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, इंग्रजी असं लेखकाचं पंचभाषिक असण्यातून स्फुटात ते शब्दसौंदर्य प्रतिबिंबित होते त्यामुळे काही स्फुटे ललित, मनोहर होऊन जातात. या स्फुटांत ज्वाला आणि फुले यांचे अद्वैत पुस्तकास वाचनीय बनवते. अलीकडे आपली मराठी इंग्रजीशी भ्रष्ट संसार, संगत करत प्रदूषित होत आहे. यात पाश्चात्त्य मानसिकतेचा प्रादुर्भाव आहे. ती लागण लेखकाच्या शब्दकळांना लागली आहे. फ्लॅट, प्लॉट, ब्लॉक, लॉन, लिफ्ट, हेल्थ, स्वीमिंग पूल, ग्लोबल व्हिलेज, टी.व्ही. फोन असे शब्द सर्रास वापरण्यातून आपण उच्चशिक्षित असल्याचा भाव व्यक्त करण्याची मानसिकता ही। संपर्क क्रांतीचा दुष्परिणाम खरा. पण त्यातून आपण स्वतःस वाचवले तरच आपली भाषा सुरक्षित राहणार. नवी पिढी शिकते इंग्रजी, पाहते हिंदी आणि बोलते मराठी. या त्रैभाषिक पिढीचं क्रियापद काय ते मातृभाषी राहिलं आहे. तेही एक दिवस माकडाच्या शेपटीसारखं झाडून गेलं तर हाती काय राहणार? याचा विचार मराठी व्हासाची वाट न पाहता तत्परतेने व्हायला


प्रशस्ती/२४१