पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

हवा. २५0 पृष्ठांमध्ये हजार शब्द परभाषी. आणि ते अकारण-सकारण प्रयोग, पर्याय नाही म्हणून प्रयोग मी क्षम्य मानतो. भाषा संकरापासून लेखकाने स्वतःस जपले पाहिजे.
 यात लेखकाचा दोष नसून ती काळाचा महिमा आहे. लेखक राजकारणाच्या निमित्ताने सहकाराशी जोडलेला आहे. त्याचा काहीएक अनुभव त्याच्या गाठीशी असल्याने या स्फुट लेखातील शेती, सहकार, अर्थ, राजकारण, दुष्काळ, आत्महत्या इ. विषय संबंधी लेखकाचे निरीक्षण व वक्तव्य वाचताना आपण अनुभव समृद्ध झाल्याची वाचकास येणारी प्रचिती म्हणजे ‘वाचनाने जग बदलते' याची पावतीच होय. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात असा त्रैराज्यिक आवाका त्यामुळे तर हे लेखन भारतीय पातळीचे बनून जाते. महात्मा गांधी, गौतम बुद्ध प्रभृती महामानवांप्रती लेखकाच्या मनातील आदरामुळे हे लेखन मानव हितवर्धक झाले आहे. जागतिकीकरणाचे लेखकाचे भान याच शीर्षकाच्या एका स्फुटातून स्पष्ट होते. या प्रत्येक स्फुटाच्या शेवटी लेखक निष्कर्षाप्रत येतो. पंचतंत्रातील कथेच्या शेवटी जसा ‘बोध' असतो तसे हे लेखन वृत्तपत्र समाजाच्या चौथा स्तंभ अशामुळे की ‘मत' निर्माण करतो. मानवी मनाचे रूपांतर मतात करणे ही किमया केवळ वृत्तपत्रीय लेखनासच साधते. किंबहुना ते त्याचे कार्यही असते. अशोक केसरकर यांनी ते निभावून आपण लेखकाबरोबर पत्रकारही। आहोत हे नकळत अधोरेखित केले आहे.


 सदर लेखन, स्फुट लेखनाची शब्दमर्यादा हा लेखनापुढचा मोठा अडसर ठरतो. विशेषतः हौशी लेखक जेव्हा वृत्तपत्रात स्फुट लेखन करतो, तेव्हा हा काच प्रकर्षाने असतो. अशोक केसरकरांना भरपूर सांगायचे असते पण शब्दमर्यादांच्या बंधनामुळे त्यांना ‘गागर में सागर’, ‘टिकलीत तळे अशा पद्धतीची संक्षिप्तीकरण शैली वापरावी लागली आहे. त्यात प्रतिभेचा झालेला संकोच व विचार आविष्करणाची झालेली कोंडी यामुळे हे लेखन ‘जसं सुचलं तसं लिहिलं गेलं नसून ‘जसं सांगितलं तसं' झाल्याने त्याचे सहज सौंदर्य हरवले आहे. त्यासाठी एकदा अशोक केसरकरांनी मुक्त लेखनाचा रियाज करून पहावा. त्यात त्यांना मोकळा श्वास घेतल्याची अनुभूती येईल व मोकळे होण्याचा आनंद मिळेल. लेखनानंतर लेखकाचं हलकं होणं ही लेखनाची खरी इतिश्री. लेखक लिहितोच मुळी अस्वस्थता, बेचैनीतून मुक्त होण्यासाठी |
 या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीपलीकडे जाऊन हे लेखन एक संवेदी हितगुज झाले आहे. स्फुट लेखनास क्षणिकतेचा शाप असला तरी अशोक

प्रशस्ती/२४२