पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संग्राहकही होते हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवते. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, मृणाल सेन, सी. रामचंद्र, राजा ठाकूरसारखे या सृष्टीतील मान्यवर आपणास भेटतात. त्यांच्या आठवणी वाचताना माधव देशपांडे यांना चित्रपट सृष्टीचा इतिहास खडानखडा माहीत असल्याचं जाणवतं. चित्रपट तयार व्हायला प्रत्यक्ष किती रीळ फिल्म लागते, प्रत्यक्षात किती खर्च होते, त्यात वाया किती जाते, त्यामुळे परकीय चलनाचा अपव्यय । किती होतो, हे सारं दिग्दर्शकाला संकलनाची तांत्रिक माहिती नसल्यानं कसं घडतं हे माधव देशपांडे विस्ताराने समजावतात, तेव्हा या लेखनामागील त्यांची तळमळ स्पष्ट होते. शासनाच्या कर परतीच्या योजनेचा बोजवारा धंदेवाईक निर्मात्यांनी कसा केला हेही नोंदवायला ते विसरत नाहीत. निर्माते, दिग्दर्शक अभिनेत्यांवर लाखो रुपये उधळतात पण तंत्रज्ञांना पैसे देताना मात्र ते हात आखडता घेतात हे अनेक लेखांतून स्पष्ट होतं. निर्माते, दिग्दर्शकांची ही असहिष्णुता तंत्रज्ञ व सहाय्यकांवर अन्याय करणारी जशी वाटते तशी ती चित्रपट निर्मिती ‘समूह कार्य (टीम वर्क) असल्याने विस्मरण करणारी आहे या वर्मावर माधव देशपांडे बोट ठेवतात तेव्हा या लेखनाचं सामाजिक महत्त्व रेखांकित झाल्याशिवाय राहात नाही. माधव देशपांडे तंत्रज्ञांच्या संघटनेचे कार्यकर्तेही होते. संगठन कार्यातील त्यांचे अनुभव आजही बोधपट वाटतात.

 ‘पडद्यामागे खंडात सहाय्यक दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक, नृत्य दिग्दर्शक, छायालेखक, संकलक, स्पॉट बॉय, रंगभूषाकारासारख्या छोट्या परंतु निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावणारे कलाकार आपणास भेटतात. ही मंडळी फक्त आपणास चित्रपटाच्या । प्रारंभी असलेल्या श्रेयनामावलीत -तीही छोट्या अक्षरात, क्षणभर दिसली नाही तर नाही. चित्रपटाच्या मुहूर्ताच्या खेळास यांना बोलावण्याची उदारता फारच कमी निर्माते व दिग्दर्शक दाखवतात. अशांबद्दल माधव देशपांडे यांनी पहिल्यांदा लिहून चित्रपट इतिहास लेखनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. बाळ मोहिते, डॉ. श्रीकांत नरूले, वाय. जी. भोसले, प्रकाश हिलगे, वसंत शेळके यांच्यासारख्या मंडळींची जीवनवृत्ते वाचताना व्यक्ती व कार्य म्हणून काही ते नगण्य वाटत नाही, पण चित्रपट व्यवसायाच्या पारंपरिक उतरंडीचे ते बळी ठरून उपेक्षित राहतात याचं वैषम्य नि विषाद वाटल्यावाचून राहात नाही.

 ‘उपेक्षित कलाकार' हा या पुस्तकाचा शेवटचा भाग म्हणजे चित्रपट, नाटक, नृत्य क्षेत्रात धडपडणाच्यांची संघर्ष गाथाच होय. ती हृदयाला

प्रशस्ती/२३