पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________



डॉ. नरेंद्र दाभोळकर : व्यक्ती आणि विचार (चरित्र)
प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण
अक्षर दालन, कोल्हापूर१
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१७ पृष्ठे - १९६ किंमत - २५0/

_______________________________________

पुरोगामी समाज रचनेचा खटाटोप

 डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी लिहिलेले ‘नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार' पुस्तक 'मोनोग्राफ' म्हणता येईल अशा स्वरूपाचे आहे. ते चरित्र आहे खरे, पण केवळ चरित्र नाही. विचार, कार्य, चळवळ अशा अंगाने एक माणूस समजून घ्यायचा हा एक विनम्र प्रयत्न आहे. या प्रयत्नामागे व्यक्तीने केलेल्या कार्याबद्दलची आस्था व विचारांप्रती सन्मानाचा भाव दिसून येतो. या लेखनाला संशोधनाची बैठक आहे. शिवाय शैलीला शिस्त आहे वैज्ञानिकतेची! चरित्र व्यक्तीचा इतिहास असतो, तर मोनोग्राफ शोध! त्यामुळे या लेखनास संशोधनात्मक चरित्र म्हणता येईल.
 या छोटेखानी चरित्राच्या प्रारंभी डॉ. शानेदिवाण यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची जडणघडण स्पष्ट केली आहे. दाभोलकर उपजत पुरोगामी असण्याचे कारण घर व परिसरात लाभलेले वातावरण व व्यक्ती असल्याचे दिसून येते. डॉ. दाभोलकरांचे आयुष्य म्हणजे सूर्य गिळंकृत करण्यासाठी हनुमानाने घेतलेली उडी होय. अशी अचाट ऊर्मी एखाद्या व्यक्तीत निर्माण व्हायची तर तशी ऊर्जा उपजतच असावी लागते. खेळातून नि विचार, वाचन, संस्कारातून डॉ. दाभोलकर घडले. त्यांचे बंधू आपापल्या क्षेत्रातील दिग्गज. शेती, शिक्षण, विज्ञान अशी शास्त्रीय बैठक लाभलेली चर्चा, व्यवहार व वातावरण घडणीच्या काळात राष्ट्रसेवा दल, समाजवादी


प्रशस्ती/२२१