पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



थोरांचा सहवास लाभला. शिक्षणही त्यांनी वैद्यक विज्ञानाचेच घेतले. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर विशुद्ध वैज्ञानिक झाले. विज्ञानातच वैज्ञानिक असतात, हा आपला गैरसमज आहे. वैज्ञानिक असणं ही कोणा विद्याशाखेची मिरासदारी नाही. वैज्ञानिक असणं ही वृत्ती आणि दृष्टी आहे, हे एकदा लक्षात आले की कलेच्या क्षेत्रात प्रयोग करणारा कलंदर कलाकार नवनिर्मिती करतो ती का हे आपल्या लक्षात येईल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सनातनी सश्रद्ध समाज विवेकाची कसोटी हरवतो व अंधश्रद्ध होतो, ही सांगितलेली गोष्ट समाजशोध व चिकित्सा होय. हा प्रवास ज्या पठडीत झाला त्याची उकल डॉ. शानेदिवाण यांनी अष्टांगी अभ्यासातून सिद्ध केली आहे.

 ‘कुछ बनो' या लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संदेशाने प्रभावित होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘हटके बनले. या प्रक्रियेची सविस्तर चर्चा या चरित्रात आहे, आपण नेहमी असे पाहात आलो आहोत की माणसाच्या बनण्याचे काही प्रसंग, घटना, व्यक्ती, कारणे असतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात काटकोनात कायाकल्प घडून येतो. हा कायाकल्प निमित्ताने एका घटनेतून होत असला तरी ती एक सुदूर व सुदीर्घ प्रक्रिया असते. डॉ. शानेदिवाण त्याचीही सविस्तर चर्चा या चरित्रात ठायीठायी करतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांचा अभ्यास संशोधकाच्या शोधक वृत्तीची खूणगाठ होय. डॉ. दाभोळकर संयम व संवादाच्या साधनांद्वारे समाज परिवर्तन घडवू इच्छित होते, हे लेखकाचे निरीक्षण चरित्र नायकाच्या कार्य वृत्तीचा नेमका व मार्मिक शोध होय. तो एखाद्याच्या व्यासंगपूर्ण अभ्यासातूनच शक्य होतो. या चरित्राचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य यातून साकारले आहे; ते असे की चरित्राची भाषा सुबोध असली तरी लेखकाचा चरित्र नायकाचा धांडोळा संदर्भ पिंजून काढण्यातून हाती आलेला आहे. वाक्ये छोटी व सुबोध असली तरी ती सारग्राही आहेत. त्यामुळे हे चरित्र कमी पृष्ठात मोठा आवाका कवेत घेते. त्यातून ‘गागर में सागर' असे या चरित्राचे रूप-स्वरूप बनून गेले आहे. ते वाचकाला काहीतरी नवे मिळाल्याची अनुभूती देते. ती त्याची मिळकत ठरते.

 सदर चरित्राद्वारे डॉ. शानेदिवाण यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खिलाडूवृत्ती, निर्भयता, निर्धार, पारखी नजर, विचारप्रवण कृती, ध्येयासक्ती इत्यादी पैलूंवर प्रकाश टाकत चरित्र नायकाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उलगडले आहे. ‘जडणघडण' या प्रकरणात लेखक चरित्र नायकाच्या जन्मापासून ते कार्यकर्ता, नेता होईपर्यंतचा प्रवास साक्षेपी पद्धतीने मांडत गेल्याने वाचकास प्रथम दर्शनीच लक्ष्य चरित्राची महात्मता प्रत्ययास येते. आपण चरित्र

प्रशस्ती/२२२