पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसा उभा राहावा अशी राजाची अपेक्षा असायची. अशा परंपरेत कार्य केलेल्या वसा नि वारसा घेऊन तानाजी कुरळे यांना गाव कामगार पाटील व्हावे वाटले व तसे ते झाले. माणूस एखादं स्वप्न घेऊन एखाद्या व्यवसायात येतो खरा. पण तिथल्या बजबजपुरीने तो खंतावतो. कुरळे हे पुरोगामी चळवळीतील भूमिगत कार्यकर्ते. ते कार्य करतात पण मिरवत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन, समता परिषद, विज्ञान प्रबोधिनी अशा उपक्रमातून त्यांचा कार्यकर्ता घडला आहे.

 ‘पोलीस पाटील' कथासंग्रहातील पहिली कथा ‘भुताचा बाप' वाचताना लेखकावरील अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा प्रभाव स्पष्ट होतो. मुंबईच्या बकाल चाळीतील सार्वजनिक संडासात भूत असल्याच्या आवईने सारी चाळ बेजार असते. पण कथानायक गुणाजी गायकवाड आपल्या निरीक्षणातून लोकांना होणारा भास भूत नसून तो भ्रम आहे. पालीमुळे लोंबकळणारा दिवा कसा हलतो, त्यामुळे सावली कशी हलते-डोलते, लोकांना त्याचे भय कसे वाटते, हे कथाकार स्पष्ट करतो. तसेच संडासात येणारा खर्रऽऽ खर्रऽऽ आवाज कोब्या खालच्या वाळूचा कसा आहे, घूस घर कशी करते या निरीक्षणातून चाळकरींना भूतबाधेतून मुक्ती कशी देतो याचं साद्यंत विवेचन करणारी ही कथा. कथाकाराने अशा कथेस आवश्यक भय व जिज्ञासा दोन्हीच्या निर्मितीने गूढकथा बनवली आहे. अंधार चाळीचा नि अज्ञानाचा तो तर्क व ज्ञानाने दूर करून अंधश्रद्धेचा, भुताचा केलेला । पर्दाफाश नायकास ‘भुताचा बाप' बनवतो.

 संग्रहातील ‘शीळ' कथा हेरकथेला शोभणारी आहे. खेड्यात पडलेल्या एका दरोड्याचा शोध नुकतीच पोलीस पाटील बनलेली ज्योती चांदणे कशी लावते, तिला पोलीस इन्स्पेक्टर झालेली उषा थोरात कशी मदत करते, याची ही कथा. या कथेत पुरुषी सत्ता असलेल्या पारंपरिक पोलीस व्यवस्थेत व एकूणच प्रशासनात महिलाराज कसे आले आहे, ते लेखकाने खुबीने रेखाटले आहे. बिराप्पा धनगराची गिरफ्तारी हे या कथेतलं खरं नाट्य. ते लेखकाने कमालीच्या शिताफीने रंगवलं आहे. नायिकाप्रधान ही कथा ‘शीळ'द्वारे दरोडेखोराच्या तपासाची कथा. ती तपासाचे बारकावे । चित्रित करून कथाकाराने आपले वर्णन कौशल्य पणाला लावले आहे. आरोपींना जेरबंद करण्याचा प्रसंग सिनेमाला शोभणारा. एकंदरच ही कथा पोलीस तपासाच्या अंगाने रोचक बनवली आहे.

 ‘मान’, ‘दाखला', 'पोलीस पाटील' या कथा संग्रहापूर्वी स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'मान' कथेमागे पर्यावरण संरक्षणाचं

प्रशस्ती/१८३