पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भान आहे. 'दाखला' कथा सामाजिक प्रश्न म्हणून विचार करायला लावणारी आहे. चंद्राबाई यादवी विधवा युवती. तिला निराधार निवृत्ती वेतनासाठी दाखल्याची गरज असते. सरपंच तिच्या नाडलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. पण ती त्यातून स्वतःला वाचवते. पोलीस पाटील असलेले राम कुंभार. तिचा पुनर्विवाह आपले स्नेही शाम साळुखे यांचेशी घडवून आणतात. अशी ही सुखान्त आदर्शवादी कथा. पोलीस पाटील कथेद्वारे दारूच्या व्यसनाधीनतेचे चित्रण करून भुताचे सोंग घेणारा भैराप्पा त्याच्या वस्त्रहरणाची ही कथाही बोधकथा बनून राहाते. बाळू वडर' कथा जातीयतेला छेद देत समता स्थापन करणारी अशीच कथा आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.

 संग्रहातील अन्य कथाही याच पठडीतल्या. त्या सर्व वाचत असताना कथाकाराचा आदर्शवाद लपून राहात नाही. तानाजी कुरळे कथाकार म्हणून नि कार्यकर्ते म्हणूनही भाबडे आहेत. जग मंगल व्हावे ही त्यांची आंतरिक ऊर्मी आहे. सदाचाराच्या ऊर्जेवर जगणारा हा कथाकार. त्याला जगातलं वैर, दुष्टावा, फसवणूक, अंधश्रद्धा, अज्ञान, विषमता दूर व्हावी असं वाटणं स्वाभाविक आहे. ती त्यांची पोटतिडीक आहे. सभ्य माणसं सज्जनतेचा घोषा लावतात म्हणून समाज सरासरीने शिष्ट, नैतिक राहतो. हीच कथा बोधपर कथांची मिळकत नि सामाजिक योगदानही! त्यांनी हे चांगुलपण व त्यावरील श्रद्धा अटळ ठेवावी. उशिरा का असेना, उजाडेल अशा आशावाद जागवणाच्या या कथा गावच्या पालक पदाधिकारी मंडळींना त्यांच्या जबाबदारीचे भान जसे देतात तशाच त्या सामान्य नागरिक म्हणून वाचकात कर्तव्य भाव रुजवतात. हे उभयपक्षी महन्मंगल सीमोल्लंघन प्रत्यक्षात घडेल तर महात्मा गांधींच्या स्वप्नातील रामराज्य अवतरेल! लेखनास शुभेच्छा !


◼◼

दि. २४ नोव्हेंबर, २०१५

प्रशस्ती/१८४