पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची भूमिका प्रतिसाद सकारात्मक राहिला. कारण ते मुळात विधायक वृत्तीचे पुरोगामी कार्यकर्ते व संघटक होत. पण जिथे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचे निर्णय झाले, शिक्षकांच्या हक्कांवर नांगर फिरवणारी धोरणे जाहीर झाली, तिथे तिथे त्यांची प्रतिक्रिया तीव्र, तिखट असली तरी व्यवस्थेला सुरुंग लावणारी नव्हती. व्यवस्था टिकली तरच नोक-या टिकणार याचं भान ठेवून संघटन कार्य करण्याची जागरूकता आरडे यांनी आयुष्यभर दाखविली असल्याने त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटणे स्वाभाविक आहे. तसा प्रत्यय सदर लेख वाचताना येतो. त्यामुळे हे लेखन मला आश्वासक वाटले. आपणासही ते वाटेल असा मला विश्वास आहे.
 या लेख संग्रहात विषयाची विविधता आहे. प्राथमिक शिक्षणविषयक बृहत आराखडा, इंग्रजी शाळांचा अतिरेक, पटपडताळणी, सर्व शिक्षा अभियान, पदवीनंतर डी.टी.एड., प्राथमिक शाळांचे सर्वेक्षण व नियंत्रण, प्राथमिक शिक्षण हक्क विधेयक, पेन्शन हक्क, शिक्षक गुणवत्ता असे विविध विषय घेऊन लिहिलेले लेख महाराष्ट्रातील वर्तमान प्राथमिक शिक्षणाचे प्रश्न मांडणारे होत. त्याचा पाया शिक्षक हक्क व कर्तव्ये, शिक्षक व शिक्षकांची गुणवत्ता हाच आहे. प्रभाकर आरडे हे चांगले चिकित्सक वाचक असल्याने जगातील शिक्षण विषयक घटनांसंबंधी प्रतिक्रिया व प्रतिसाद म्हणूनही त्यांनी वेळोवेळी लेखन केले आहे. फ्रान्सचा पेन्शन विषयक नवा कायदा, ऑक्सफर्डचे ‘ढ' विद्यार्थी, फी वाढ विरोधातील ब्रिटिश विद्यार्थ्यांचे आंदोलन असे विषय हाताळताना ते शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, कामगार अशा चतुर्दिक पैलूंना स्पर्श करून आपलं लेखन चतुरस्त्र बनवतात.

 शिक्षण विषयक हे लेख सैद्धांतिक नाहीत. ते प्रश्नांची मांडणी करतात. मांडणीत उदाहरणे आल्याने ते अनुभवसंपन्न झाले आहेत. लेखकाचं आयुष्य शिक्षणात गेलं. तो सतत कोणत्या ना कोणत्या संघटना, चळवळी, उपक्रमांशी स्वतःला जोडत आला. त्यामुळे त्याचं म्हणून एक समाजमन तयार झालेलं आहे. तो एक चांगला समाज निरीक्षक आहे. त्यामुळे प्रश्नांचे विविध पैलू त्याच्या लक्षात येतात आणि म्हणून या पुस्तकातील लेख एकांगी न होता बहस्पर्शी होतात. लेखकाचा स्वतःचा असा प्रगतिशील दृष्टिकोण आहे. नव्याचं स्वागत ते करतात पण चिकित्सकपणे त्यात भाबडेपणा नाही, की भावुकता नाही. असेलच तर जमिनीवर पाय ठेवून आकाशाकडे पाहायची वृत्ती! बोगस पट नोंदणीतून होत असलेल्या भ्रष्टाचाराचा ते विरोध करतात आणि तेही शिक्षक पदे यातून धोक्यात येण्याची शक्यता असून. कारण

प्रशस्ती/१२८